तीन दिवसांपूर्वी पाटीलमळा येथे घडली होती घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
मिळकतीच्या वाटणीच्या वादातून मुलाने केलेल्या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या बापाचा शनिवारी सकाळी खासगी इस्पितळात मृत्यू झाला. तीन दिवसांपूर्वी पाटीलमळा येथे ही घटना घडली होती. खडेबाजार पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण लक्काप्पा शिरूर (वय 58, मूळचे रा. कणबर्गी, सध्या रा. पाटीलमळा) असे त्या दुर्दैवी बापाचे नाव आहे. त्याचा मुलगा सोमनाथ (वय 32) याने गुरुवार दि. 4 मार्च रोजी दुपारी 4.30 वाजता आपल्या बापावर चाकू हल्ला केला होता. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मण यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचाराचा उपयोग न होता शनिवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे.
लक्ष्मण यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. शनिवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खडेबाजार पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक धिरज शिंदे व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.
उपलब्ध माहितीनुसार लक्ष्मण हे एका खासगी कंपनीत काम करत होते. ते मूळचे कणबर्गीचे आहेत. एक वर्षापूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे. बापावर चाकू हल्ला करुन खून करणारा सोमनाथ हा आपल्या कुटुंबासह कोतवाल गल्ली येथे राहत होता. वडीलांनी खरेदी केलेल्या भूखंडावर सोमनाथचा डोळा होता. केवळ मुलींचाच विचार करतोस, माझ्या नावाने भूखंड करुन दे, असे सांगत तो आपल्या वडिलांना धमकावत होता.
गुरुवार दि. 4 मार्च रोजी सोमनाथ वडिलांना भेटायला पाटीलमळा येथील घरी गेला. त्यावेळी त्याच्या दोन बहिणी घरात होत्या. वाटणीच्या वादातून बाप-लेकांत भांडण झाले. एका मुलीचे लग्न झाले तरी ती माहेरीच राहते. दुसऱया मुलीचे लग्न करायचे आहे. त्यांचे सर्व काही होवू दे, नंतर तुझी वाटणी तुला देतो, असे वडिलांनी समजावून सांगितले. मात्र राग अनावर झालेल्या सोमनाथने त्यांच्यावर चाकुने सपासप वार केला. गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मण यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. परंतु उपचाराचा उपयोग न होता त्यांचा मृत्यू झाला.