प्रतिनिधी/ डिचोली
डिचोली मतदारसंघातील रस्त्यांवर पडलेल्या धोकादायक खड्डय़ांबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी डिचोली काँग्रेसचे नेते मेघश्याम राऊत यांनी गांधीजयंतीदिनी गांधीगिरीचे दर्शन घडवत शांततेच्या मार्गाने रस्त्यावर झोपून आंदोलन केले.
दरम्यान राऊत यांना डिचोली पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून अटक केली. उपजिल्हाधिकाऱयांसमोर त्यांना हजर केले. त्यांना समज देऊन सोडण्यात आले. मात्र हे आंदोलन चर्चा डिचोलीत लक्षवेधी ठरले.
डिचोली मतदारसंघात अस्नोडा येथून येणाऱया रस्त्यावर तसेच पुलावर पडलेल्या खड्डय़ांमुळे आज लोक त्रस्त झाले असून सरकारला या खड्डय़ांबाबत काहीच पडून गेलेले नाही. याकडे मंत्र्यांचे व संबंधित अधिकाऱयाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. याबाबत राऊत यांनी जाहीरपणे निषेध करत जोरदार टीका यावेळी मेघश्याम राऊत यांनी केली.
मुळगाव अस्नोडा भागात पडलेल्या या जीवघेण्या खड्डय़ांमध्ये अनेक दुचाकी चालक पडून जखमी झालेले आहेत. परंतु त्याकडे सरकारचे अजिबात लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. सरकार आज गोवेकरांच्या जीवाशी खेळ करीत आहे. लोकांच्या खिशातून करस्वरूपात सरकारी तिजोरीत येणाऱया पैशातून लोकांना चांगले रस्ते आणि इतर सोयी देण्याच्या सोडून सरकार सध्या आपलेच हित जपण्यात मग्न आहे. अशा शब्दांत मेघश्याम राऊत यांनी हल्लाबोल केला.
मुळगाव पार येथे काँग्रेस नेते मेघश्याम राऊत, नझीर बेग, विशाल मांदेकर, बाला खान गोरी व इतरांनी हातात वेगवेगळे फलक घेऊन घोषणा देत परिसर दणाणून सोडला. मेघश्याम राऊत व नझीर बेग यांनी थेट रस्त्यावरील खड्डय़ात ठाण मारत रस्त्यावर झोपले. यावेळी डिचोली पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांना उठवले आणि पोलीस वाहनात बसविले आणि पोलीस स्थानकात आणले. तेथे त्यांच्याविरोधात 151 कलमान्वये गुन्हा नोंदवून अटक केली. उपजिल्हाधिकाऱयांसमोर त्यांना सादर केल्यानंतर समज देऊन सोडण्यात आले.
पोलीस कोठडीतच आमरण उपोषणाचा दिला इशारा