मडगाव : सय्यद मुश्ताक अली टी-20 चषक क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा शेवटचा लीग सामना आज विदर्भशी होणार आहे. आज इमॅरल्ड हाईट्स आंतरराष्ट्रीय स्कूल मैदानावर हा सामना होईल.
गोव्याने मागील लीग सामन्यात राजस्थानचा 37 धावानी पराभव केला होता. सलामीच्या लीग सामन्यात मध्यप्रदेशशी निसटत्या 6 धावांच्या फरकाने पराभूत झाल्यानंतर गोव्याने दुसऱया लीग सामन्यात सेनादलचा 5 विकेट्सनी पराभव केला. त्यानंतर तिसऱया लीग सामन्यात गोव्याला सौराष्ट्रने 90 धावानी नमविले.
विदर्भ आपल्या सर्व लीग सामन्यांत पराभूत झाला असून आज गोव्याला स्पर्धेची विजयाने सांगता करण्याची नामी संधी आहे. सध्या चार लढतीनंतर राजस्थान, मध्यप्रदेश आणि सौराष्ट्रचे 4 सामन्यांनंतर प्रत्येकी 12, गोव्याचे चार सामन्यांनंतर 8, सेनादलचे 4 तर विदर्भचा गुणफलक कोराच आहे. राजस्थान सध्या पहिल्या स्थानावर असून मध्यप्रदेश दुसऱया, सौराष्ट्र तिसऱया तर गोवा चौथ्या स्थानावर आहे.