विम्बल्डन ग्रँडस्लॅम ः कनिष्ठ विभागात होव्हडे, पोलिसॅक अजिंक्य
वृत्तसंस्था/ लंडन
ऑस्टेलियाच्या मॅथ्यू एब्डन व मॅक्स पर्सेल यांनी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीचे जेतेपद पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी विद्यमान विजेत्या निकोला मेक्टिक व मेट पॅव्हिक यांच्यावर पाच सेट्सच्या झुंजार लढतीत मात करून पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविले.
शेवटच्या दोन सामन्यात आठ मॅचपॉईंट्स वाचविणाऱया ऑस्ट्रेलियन जोडीने निर्णायक पाचव्या सेटमध्ये ब्रेकमधून सावरत मेक्टिक-पॅव्हिक यांच्यावर 7-6 (7-5), 6-7 (3-7), 4-6, 6-4, 7-6 (10-2) असा रोमांचक विजय मिळविला. ‘बालपणी पाहिलेले स्वप्न साकार झाले, असे अनेकजण म्हणतात. पण मी तसे स्वप्नही पाहिल्याचे मला आठवत नाही,’ असे 34 वर्षीय एब्डन नंतर म्हणाला. ‘मला व्यावसायिक टेनिसपटू व्हायचे होते आणि टॉप टेनमध्ये पोहोचणे हे माझे उद्दिष्ट होते. मागील वर्षीपासून मात्र आम्ही ग्रँडस्लॅम जिंकू शकतो, असा विश्वास वाटू लागला आणि मी ते साध्य करू शकेन असे वाटत होते. जेतेपदानंतर मी कोर्टवर पाठीवर झोपलो आणि मॅक्सला आम्ही विजेते ठरल्याचे म्हणालो. एक अशक्य गोष्ट साध्य केल्याची भावना होती त्यावेळी. मॅक्स हा 24 वर्षाचा आहे. आम्ही प्रत्येक सामना सरळ सेट्सनी जिंकण्याचा प्रयत्न केला,’ असेही तो म्हणाला.
आम्हाला या स्पर्धेत कठीण ड्रॉ होता आणि प्रत्येक जोडीविरुद्ध आम्हाला संघर्ष करावा लागला. त्यात विविध ग्रँडस्लॅम आणि येथे जिंकलेल्या जोडय़ांचा समावेश होता. त्यामुळे यावेळी दुहेरीचा दर्जा सुपरस्ट्राँग होता. आम्ही आता विजेते ठरलो असलो तरी पहिल्याच फेरीत आम्हाला केवळ एका गुणाने पराभूत व्हावे लागले असते,’ अशा भावनाही त्याने व्यक्त केल्या. एब्डनने मारलेल्या पाचव्या बिनतोड सर्व्हिसवर सामना संपुष्टात आला. चार तास अकरा मिनिटे ही झुंजार लढत रंगली होती.
कनिष्ठ गटात होव्हडे, पोलिसॅक विजेते
कनिष्ठ मुलींच्या विभागात अमेरिकेच्या अग्रामानांकित लिव्ह होव्हडेने पहिले कनिष्ठ ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविताना ल्युसा उदवर्डीचा सरळ सेट्सनी पराभव केला. मुलींच्या दुहेरीत अँजेला ओकुतोयी व रोज मेरी निकॅम्प या विजेत्या ठरल्या. त्यांनी अंतिम फेरीत कायला क्रॉस व व्हिक्टोरिया एम्बोको यांच्यावर 3-6, 6-4, 11-9 अशी मात केली. ओकुतोई ही ग्रँडस्लॅम जिंकणारी केनियाची पहिली खेळाडू बनली आहे. 16 वर्षीय होव्हडेने हंगेरीच्या सातव्या मानांकित ल्युसाचा 6-3, 6-4 असा पराभव करून जेतेपद पटकावले. एक तास 16 मिनिटे ही लढत रंगली होती. यापूर्वी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत तिने उपांत्य फेरी गाठत ग्रँडस्लॅममधील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. मुलींच्या विभागात जेतेपद मिळविणारा व्होव्हडे ही अमेरिकेची 14 वी खेळाडू आहे. यापूर्वी क्लेअर लियूने 2017 मध्ये जेतेपद मिळविले होते. या शतकातील ती अमेरिकेचे पहिली कनिष्ठ चॅम्पियन बनली होती. त्याआधी 30 वर्षापूर्वी चंदा रुबेनने मुलींच्या एकेरीचे अमेरिकेसाठी शेवटचे जेतेपद मिळविले होते.
मुलांच्या कनिष्ठ विभागात तिसऱया मानांकित क्रोएशियाच्या मिली पोलिसॅकने जेतेपद मिळविले. अंतिम फेरीत त्याने अमेरिकेच्या मायकेल झेंगचा 7-6, 7-6 असा पराभव केला.