क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावच्या ग्रामीण भागातील मुला-मुलींना क्रिकेटचे सराव करता यावा यासाठी मेक देम स्माईल फौंडेशनने पुढाकार घेऊन या खेळाडूंना क्रिकेटचे किट प्रदान केले.
गौंडवाड प्राथमिक मराठी शाळा येथे सुरू केलेल्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राला मेक देम स्माईल फौंडेशनने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त या ग्रामीण भागातील क्रिकेटपासून वंचित राहिलेल्या मुला-मुलींना किट देण्याचे ध्येय बाळगून फौंडेशनचे अध्यक्ष सर्फराज खतीब यांनी किट प्रदान केले. सध्या शहरी भागात क्रिकेटचे वारे वाहत आहेत. पण ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना आर्थिक अडचणीमुळे क्रिकेट किट घेणे अवघड बनले आहे. ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंकडे चांगले कौशल्य असून सुद्धा परिस्थितीमुळे ते मागे पडत आहेत. अशा क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी मेक देम स्माईल फौंडेशनने हा उपक्रम राबविला आहे. किट देतेवेळी ग्रा. पं. सदस्य कल्लाप्पा अष्टेकर यांनी सर्फराज खतीब यांचा शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. त्याचप्रमाणे सुनील देसाई यांचाही गौरव केला. बेळगावच्या महिला क्रिकेटपटू श्रेया पोटे, झोया काझी यांचा ग्रा. पं. सदस्या रेखा सुतार यांच्या हस्ते खास गौरव करण्यात आला. या गौंडवाड परिसरात महिलांना मोफत क्रिकेट प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या मैदानावर टर्फ खेळपट्टी बनवून त्यावर सराव सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे शनिवार व रविवार सुटीच्या दिवशी सराव सामने खेळविले जाणार आहेत. यावेळी एन. आय. पिंगट, एसडीएमसी अध्यक्ष महेश सांबरेकर, भोमान्ना पोटे आदि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार एम. सी. जाधव यांनी केले.