उपनगराध्यक्षपदी कल्पना जवळ
मेढा / प्रतिनिधी :
मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षपदाच्या निवडणूकीची प्रक्रिया आज पार पडली. या प्रक्रियेत राष्ट्रवादी चिन्हावर निवडून आलेले पांडूरंग जवळ यांची नगराध्यक्षपदी तर कल्पना जवळ यांची उपनगराध्यक्षपदी निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सोपान टोंपे यांनी केली. निवडणूक प्रक्रियेसाठी त्यांना तहसिलदार राजेंद्र पोळ व मुख्याधिकारी अमोल पवार यांनी सहकार्य केले.
ठरलेल्या कालखंडाप्रमाणे नगराध्यक्ष अनिल शिंदे व उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली होती. नगराध्यक्ष पदासाठी विकास उर्फ पांडुरंग देशपांडे (भाजपा), व पांडूरंग जवळ (बापू), राष्ट्रवादी यांनी अर्ज दाखल केल्याने या निवडणूकीला प्रथमदर्शनी वेगळीच रंगत आली होती. मात्र, शिवसेनेचे नेते एस एस पार्टे (गुरुजी), त्यांचे पाच नगरसेवक, उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार, सुरेश पार्टे, नारायणराव शिंगटे, प्रकाश कदम, सचिन करंजेकर, सचिन जवळ, संजय सपकाळ, बापू जवळ, प्रविण पवार, यांच्यासह जेष्ठ मंडळींनी पांडूरंग जवळ यांच्या जेष्ठतेचा विचार करता त्यांनाच उमेदवारी देण्याचा आग्रह धरल्यामुळे जनमतानुसार आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जवळ यांच्या उमेदवारीला दुजोरा दिला. त्याला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, समाजसेवक ज्ञानदेव रांजणे यांची साथ मिळाल्यामुळे पांडुरंग जवळ बिनविरोध निवडून आले.