ऑनलाईन टीम / लखनऊ :
मोबाईलकर्त्याची ओळख जाणून घेण्यासाठी मोबाईलमध्ये असणारा IMEI क्रमांक प्रत्येक मोबाईल हँडसेटला वेगळा असणे कायद्याने बंधनकारक आहे. तरी देखील मेरठमध्ये एकाच IMEI क्रमांकाचे तब्बल 13 हजार 500 मोबाईल आढळले आहेत. त्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी मोबाइल निर्मिती करणारी कंपनी आणि त्यांच्या सर्व्हिस सेंटरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मेरठ शहर पोलीस दलातील पोलीस अधीक्षक अखिलेश सिंग यांनी एका वृत्तसंस्थेला यासंदर्भात माहिती दिली आहे.
मोबाईल वापरकर्त्याची ओळख पटवणे, मोबाईलचा गैरवापर झाल्यास गुन्ह्याची उकल करणे यासाठी ‘इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेटिंटी’ (IMEI) हा क्रमांक प्रत्येक मोबाईलसाठी वेगळा असणे बंधनकारक आहे. तरी देखील एका कंपनीकडून तब्बल साडेतेरा हजार मोबाईलला एकच IMEI नंबर देण्यात आला आहे. या कंपनीची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे सिंग यांनी सांगितले.