प्रतिनिधी / देवगड:
मोंडपार सडेवाडी येथील सूरज रवींद्र चव्हाण (12) या शाळकरी मुलाने घरातील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. सूरज हा बापर्डे येथील प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिकत होता. घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री जेवल्यानंतर सूरजने घराच्या हॉलमधील टेबलावर चढून कापडी ओढणीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. सूरजचे वडील मोंड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे चालक म्हणून सेवेत आहेत. घटनेदरम्यान ते घरी नव्हते. मात्र, सूरजची आई, आजी व भाऊ घरातच होते. सूरजने त्यांच्या नकळत आपले जीवन संपविले. हॉलमध्ये सूरजने गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास येताच त्याच्या आईने हंबरडा फोडला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती वडील रवींद्र शांताराम चव्हाण यांनी देवगड पोलिसांत दिली. देवगड पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांनी पोलीस कर्मचाऱयांसह घटनास्थळी जात पंचनामा केला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संदीप पडेलकर करीत आहेत.