माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी/ बेळगाव
पहाटेच्या वेळी फिरायला गेले असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामटय़ांनी महिलेच्या गळय़ातील 33 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र लांबविल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पुन्हा चोरटय़ांनी महिलांच्या गळय़ातील दागिने लांबविण्यास सुरुवात केली असल्यामुळे आता पोलिसांसमोरही आव्हान उभे ठाकले आहे.
अंजना बसाप्पा वासनद (रा. अंजनेयनगर) या पहाटेच्या वेळी फिरायला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या समोरून मोटारसायकलस्वार पुढे गेले. त्यापैकी एक जण मोटारसायकलवर बसून होता तर दुसरा चालत जात होता. चालत जाणाऱयाने अंजना यांच्या गळय़ातील मंगळसूत्राला हिसडा मारून मोटारसायकलवरून दोघेही भामटे पसार झाले.
या घटनेनंतर घाबरलेल्या अंजना यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत भामटे पसार झाले. या घटनेची माहिती माळमारुती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी परिसरात फेरफटका मारला. मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नाही. नंदिनी दूध डेअरीजवळ पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. 1 लाख 30 हजार रुपये किमतीचे हे मंगळसूत्र लांबविल्याचे पोलिसांनी सांगितले. माळमारुती पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.