एका मोत्याची किंमत किती असू शकते, याचे उत्तर अवघड आहे. कारण थायलंड या देशातील हचाई नियोमडेचा नामक एका कोळय़ाला मासेमारी करताना काही दिवसांपूर्वी एक शिंपला सापडला. त्यातून अस्सल मोती निघाला आणि त्याचे भाग्य फळफळले. आजवर त्याने मासे पकडून जितके पैसे मिळविले नसतील तेव्हढे या एका मोत्याने दिले. हा नैसर्गिक मोती असल्याने त्याची किंमत तब्बल 2 कोटी रूपये इतकी ठरविण्यात आली. कारण हा मोती साधा नव्हता.
पांढरे किंवा पिवळट रंगाचे नैसर्गिक मोती बरेच सापडतात. विशेषतः थायलंड हा देश तर अशा मोत्यांचे आगर मानला जातो. पण हचाईला सापडलेला मोती केशरी रंगाचा होता. या रंगाचे मोती दुर्मिळ आहेत. त्यामुळे त्यांचा दामही कल्पनातीत असतो. शिवाय हा मोती नेहमीपेक्षा मोठय़ा आकाराचा आहे. परिणामी त्याची किंमत प्राथमिक अनुमानानुसार 2 कोटी ठरविण्यात आली आहे.
हचाई आणि त्याचा भाऊ यांनी हा मोती जास्तीत जास्त किंमत आल्यानंतरच विकण्याचा निर्णय घेतला आहे. योग्य वेळी त्याचा जागतिक स्तरावर लिलाव करण्याची त्यांची योजना आहे. काही काळ थांबल्यास त्याची किंमत 3 ते 4 कोटी रूपयांपर्यंतही येऊ शकेल असे त्यांना काही तज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे आता हे बंधू त्यांच्या भाग्याचा अधिकतर लाभ उठविण्याच्या मार्गाला लागले आहेत.