ढाका / वृत्तसंस्था
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱयाला विरोध दर्शविण्यासाठी बांगलादेशात गेल्या दोन-तीन दिवसांपासून निदर्शने केली जात आहेत. रविवारीही काही संघटनांच्यावतीने देशव्यापी आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी गोळीबार केल्याने काही भागात तणाव वाढला आहे. या आंदोलनावेळी रविवारी आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ढाक्यामध्ये निमलष्करी दलाच्या जवानांना तैनात करण्यात आल्याने परिस्थिती नियंत्रणात होती. दरम्यान, बांगलादेशचा दोन दिवसांचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी रात्रीच मायदेशी दाखल झाले आहेत.
देशात विविध ठिकाणी रविवारी आंदोलन तीव्र करण्यात आले. नारायणगंज जिल्हय़ात सनरपारा येथे इस्लामिक शाळेचे अनेक विद्यार्थी आंदोलनात उतरल्याचे दिसून येत होते. आंदोलकांनी महामार्ग रोखल्यामुळे चट्टोग्राम ते ढाका ही वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक झायेदुल आलम यांनी दिली. आंदोलकांनी काही वाहनांना आग लावल्यामुळे पोलिसांना गोळीबार करावा लागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही बस आणि ट्रकना आग लावल्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. आगीवर नियंत्रण मिळाले असले तरी आंदोलकांची संख्या मोठी असल्यामुळे तणावाची स्थिती वाढतच राहिली. अशाचप्रकारचा तणाव पूर्वेकडील ब्राम्हणबारिया जिल्हय़ातील सरैल परिसरात झाल्याचे दिसून येत होते.