प्रतिनिधी/ रत्नागिरी
एलईडी मासेमारी करण्यास बंदी असतानाही नौकेवर एलईडी लावून मासेमारी करणाऱया गुहागर येथील नौकेवर मत्स्य विभागाने कारवाई केली. कारवाई करताना नौकेवरील एलईडी साहित्य जप्त करण्यात आले आहे. मत्स्य विभागाच्या पथकाने रविवारी ही कारवाई केली.
नौकेवर एलईडी लाईट बसवून मासेमारी करण्यास बंदी आहे. मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांनी नुकतेच नौकांवर कारवाईचे आदेश देखील दिले होते. यानुसार मत्स्य विभागाचे सहाय्यक आयुक्त ना. वि भादुले यांच्या मार्गदर्शनाखाली जयगड परवाना अधिकारी स्मितल कांबळे तसेच सुरक्षारक्षक परिमल मळेकर व सर्वेश आडविरकर यांनी ही कारवाई केली. साखरीआगार ता. गुहागर येथील नीलेश दगडु पाटील यांची ‘कृपा आई स्वामी’ या मासेमारी नौकेवर एलईडीचे साहित्य आढळून आले. या प्रकरणी या नौकामालकावर मसामानि अधि. 1981 अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. नौकेवरील एलईडी लाईट्सचे साहित्य जप्त केले असून अभिनिर्णय अधिकारी यांच्या कोर्टाच्या पुढील आदेशापर्यंत नौका जयगड बंदरात थांबवून ठेवण्यात आली आहे.