ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
मागील दोन दिवसांपासून अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची भेट घेतली. या भेटीत अमेरिकेने कोरोना काळात केलेल्या सहकार्याबद्दल मोदींनी हॅरिस यांचे आभार मानून त्यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले. दरम्यान, या भेटीत हॅरिस यांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्तानी भूमीवर अनेक दहशतवादी संघटना सक्रिय असून, त्याचा भारत आणि अमेरिकेच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पाकिस्तानने दहशतवादी गटाचे समर्थन थांबवावे, अन्यथा पाकला त्याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा हॅरिस यांनी यावेळी पाकला दिला.
भविष्यातील सहकार्याच्या क्षेत्रासह अंतराळ सहकार्य, माहिती तंत्रज्ञान, उदयोन्मुख तंत्रज्ञान, आरोग्य क्षेत्रातील सहकार्य या विषयांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे मोदी यांच्यासोबत अमेरिकेला गेलेले परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी सांगितले.
दरम्यान, नरेंद्र मोदी हे तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर आहेत. आज (दि. 24) हा दौरा संपणार आहे. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतील.