अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021, सकाळी 9.00
● सप्टेंबरमध्ये 10 हजार 456 कोरोनामुक्त
● एकूण 7 हजार 122 बाधित
● नियम पाळल्यास संभाव्य लाटेची शक्यता मावळतेय
● गत 24 तासात 186 नवे रूग्ण
● पॉझिटिव्हीटी 2.27 वर
प्रतिनिधी / सातारा :
गणेशोत्सवानंतर आता जिल्हावासियांना नवरात्रीचे वेध लागले आहेत. या पार्श्वभुमीवर गणेशोत्सवानंतर प्रशासन अलर्ट झाले असून, रूग्णवाढ वाढते की कमी होते यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे. गणेशोत्सवापुर्वी दहा दिवस आणि गणेशोत्सवातील दहा दिवस अशा 20 दिवस जिल्ह्यात रूग्णवाढीपेक्षा कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालात 186 नवे रूग्ण वाढले असून 8 हजार 197 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत. या आकडेवारीने जिल्ह्याचा 24 तासातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 2.27 आहेे.
जिल्हा कोरोनामुक्तीच्या आशा वाढल्या
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात मृत्यूदर कमी झाला असून रूग्णवाढही मंदावली आहे. रूग्णवाढीच्या तुलनेत कोरोनामुक्तीने वेग घेतला आहे. 19 सप्टेंबर रोजी सर्वात कमी फक्त 169 रूग्णांची वाढ झाली आहे. 1 सप्टेंबर 579 ही सर्वात जास्त रूग्णवाढ आहे. कोरोनामुक्ती वाढली असून 14 सप्टेंबर रोजी विक्रमी 1054 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 13 सप्टेंबर रोजी 804 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अपवाद वगळता कोरोनामुक्तीचा वेग दुप्पट राहिला आहे. लसीकरणाचा वेग वाढल्यास आणि नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन केल्यास जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
पुढील 15 दिवस जिल्ह्यासाठी महत्त्वाचे
गणेशोत्सव नुकताच साधेपणाने पार पडला. गणरायाच्या आगमनाने जिल्ह्यावरील कोरोना वेगमर्यादेलाही स्पिडब्रेकर लागला. मात्र तरीही पुढील 15 दिवस हे जिल्ह्यासाठी महत्त्वाचे असल्याचे गृहीत धरून जिल्हा प्रशासन अलर्ट आहे. यातच जिल्ह्यात डेंग्यू, चिकणगुणियाचे रूग्ण वाढत असल्याने आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
लसीकरणाला घाबरणारांमध्ये जनजागृती गरजेची
कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे हे स्पष्ट झाले आहे. मात्र जिल्ह्यात आता लसीचा मुबलक साठा उपलब्ध होत असला तरी लसीकरणाला येणारांची संख्या काही ठिकाणी विशेषतः ग्रामिण भागात मंदावली आहे. लसीचा साठा आल्यानंतर ऐनवेळी प्रशासकीय कर्मचारी, नगरसेवक, ग्रामपंचायत सदस्यांना लसीकरणासाठी लाभार्थी शोधण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. याउलट जेव्हा लसीचा साठा मर्यादीत असतो तेव्हा मात्र लसीकरणासाठी रांगा लागलेल्या असतात हा विरोधाभास अनेक ठिकाणी जाणवत आहे. त्यासाठी योग्य नियोजन व जनजागृतीवर भर द्यायला हवा.
गुरूवारी जिल्हय़ात
एकूण बाधित 186
एकूण मुक्त 396
एकूण बळी -01
गुरूवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमूने -2025885
एकूण बाधित – 247332
घरी सोडलेले – 237644
मृत्यू -6074
उपचारार्थ – 6046