पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरण
प्रतिनिधी/ पणजी
येथील पोलीस स्थानकावरील हल्ला प्रकरणी आपल्यावरील आरोपपत्र रद्द व्हावे, या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर केलेली याचिका न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावल्याने ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री जेनिफर व पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना एक प्रकारे धक्काच बसला आहे.
मोन्सेरात व त्यांच्या अनेक साथिदारांनी सन 2008 मध्ये पणजी पोलीस स्थानकावर मोर्चा आणला होता. त्या मोर्चाचे नेतृत्व मोन्सेरात यांनी केले होते. पोलिसांनी मागणी मान्य केली नाही, म्हणून पोलीस स्थानकावर दगडफेक, जाळपोळ वगैरे झाली होती. अनेक पोलीस कर्मचारी त्यात जखमी झाले होते. या फ्रकणाची चौकशी सीबीआयतर्फे न्यायालयात चालू होती. आता हे न्यायालय म्हापसा येथे असून या न्यायालयातील सुनावणीला स्थगिती मिळावी व आपल्या विरुद्धचे आपोपपत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका मोन्सेरात यांनी 8 वर्षांपूर्वी दाखल केली होती. ती उच्च न्यायालयात पडून होती. आयरीश रॉड्रिग्स यांनी न्यायालयाला पत्र लिहून हे प्रकरण तातडीने सुनावणीसाठी घेण्यात यावे, अशी मागणी केली होती.
म्हापसा न्यायालयात पुन्हा सुनावणी
न्यायालयाने या विषयी सुनावणी हाती घेतली. त्यावर निवाडा देताना मोन्सेरात दाम्पत्याची मागणी फेटाळून लावली. आता यामुळे सीबीआयच्या म्हापसा न्यायालयात या विषयावरील सुनावणी पुन्हा सुरू होणार आहे. यामुळे मोन्सेरात दांपत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. यापूर्वी सीबीआय न्यायालयाने त्यांना सुनावणीस हजर राहण्यास सांगितले होते परंतु, मोन्सेरात यांनी प्रकरण उच्च न्यायालयात आहे व खंडपीठाचा आदेश आल्यानंतर सुनावणीस हजर राहीन, असे म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयाचा निकष लावण्याची मागणी
न्यायमूर्ती मनीष पिवळे यांच्या समोर बाजू मांडताना आयरीश रॉड्रिग्स यांनी आमदार व खासदार तथा लोकप्रतिनिधंच्या आरोपांवरील सुनावणी लवकर व्हावी, असा आदेश एका खटल्यात यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तोच निकष इथे लावण्यात यावा, अशी मागणी केली होती. न्यायमूर्तींनी बाजू उचलून धरली व सीबीआय न्यायालयात हा खटला जलदगतीने चालविण्यात यावा, असे म्हटलेले आहे.
सपूर्ण गोमंतकीयांचे खटल्याच्या निवाडय़ाकडे लक्ष मोन्सेरात व त्यांची पत्नी जेनिफर या दांघांनाही भाजपने उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केल्याने भाजपही न्यायालयाच्या या निवाडय़ामुळे अडचणीत आलेला आहे. पणजी पोलीस स्थानक हल्ला प्रकरणी मोन्सेरात दांपत्याबरोबरच ताळगावचे काँग्रेसचे उमेदवार रॉडिगीस, उदय मडकईकर व इतर अनेक जणांवर आरोपपत्र ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे या खटल्याच्या निवाडय़ाकडे साऱया गोमंतकीय जनतेचे लक्ष लागू होते.