माजी मंत्री ऍड. रमाकांत खलप यांची मोप विमानतळ नामकरण संघर्ष समितीतर्फे आयोजित बैठकीत मागणी
प्रतिनिधी / म्हापसा
देशात प्रत्येक महापुरुषाचे नाव या ना त्या प्रकल्पांना देतो, तसेच भव्य व दिव्य अशा मोपा विमानतळाला गोमंतकीय महापुरुष गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी माजी केंद्रीय कायदामंत्री ऍड. रमाकांत खलप यांनी म्हापसा येथील हनुमान नाटय़ सभागृहात मोप विमानतळ नामकरण संघर्ष समितीने आयोजित बैठकीत बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर भाऊंचे नातू समीर काकोडकर, ऍड. महेश राणे, विजय भिके, संजय बर्डे, रमेश नाईक, एकनाथ म्हापसेकर, तुषार टोपले, सुभाष केरकर, मार्शल परेरा उपस्थित होते.
सरकारने काळाची पावले ओळखावी
ऍड. खलप पुढे म्हणाले की, सरकारने काळाची पाऊले ओळखावी, जनतेचा मानस ओळखा, जनतेच्या भाऊबद्दल हृदयाचे ठोके ओळखा कारण आज एकही असा पुढारी, आमदार, खासदार नाही जो आपले मूळ विसरण्याचा प्रयत्न करील. कारण ते मूळ भाऊंच्या काळजात आहे.
40 ही आमदारांबरोबर पेडण्यातील आमदारांनी पाठिंबा द्यावा
आमचे 40 आमदार आहेत. त्यात पेडण्यातील 2 आमदार आहेत. तसेच दोन्ही खासदारांनी आपला पाठिंबा मोपाला स्व. भाऊसाहेब बांदोडकरांचे नामकरण करण्यासाठी द्यावा व तसे प्रयत्न करावे. हीच खरी श्रद्धांजली भाऊसाहेबांना ठरेल. देशभरातील व जगातील नागरिकांना भाऊसाहेबांचे कार्य समजावे यासाठी हे विमानतळ कारण ठरणार असल्याचेही ऍड. खलप म्हणाले.
मोपाला भाऊसाहेबांचेच नाव द्या ः समीर काकोडकर
स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव प्रत्येक गोमंतकीयांच्या हृदयात आहे. आज माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय संरक्षणमंत्री स्व. मनोहर पर्रीकर जिवंत असते तर त्यांनीही भाऊंचेच नाव पुढे केले असते. कारण भाऊंबद्दल त्यांना आदर, प्रेम होते. झुवारी पूल उभा राहत आहे त्याला स्व. पर्रीकरांचे नाव द्या मात्र मोपाला स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचेच नाव द्या, अशी मागणी भाऊंचे नातू समीर काकोडकर यांनी केली.
भाऊसाहेबर थोर व्यक्तिमत्त्व ः ऍड. महेश राणे
म्हापशातील वकील ऍड. महेश राणे म्हणाले, गोमंतकाच्या शिक्षण क्षेत्रात भाऊंचे नाव मोठे आहे. त्यांच्यामुळेच आज सर्वजण शिकू शकले. कष्टकरी समाज मग तो दलित, धनगर व अन्य कुणी असो त्यांना भाऊंनी सदैव हात दिला. त्यांची तुलना अन्य कोणत्याच नेत्याशी होऊ शकत नाही म्हणून अशा थोर व्यक्तिमत्त्वाचे नाव मोप विमानतळाला द्यावे, असे ते म्हणाले.
भाऊंच्या नावाशिवाय मोपला पर्याय नाही
स्व. भाऊसाहेब बांदोडकर हे गोमंतकात एक आदर्श घेण्यासारखे व्यक्तिमत्त्व असून भाजप सरकारने कोणताही भेदभाव न करता स्व. भाऊसाहेबांचे ना मोपाला द्यावे व नवीन झुवारी पुलाला स्व. पर्रीकरांचे नाव द्यावे. तसे न झाल्यास आम्हाला आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय नाही, असे रमेश नाईक, संजय बर्डे, विजय भिके, एकनाथ म्हापसेकर, सुभाष केरकर म्हणाले.
सूत्रसंचालन तुषार टोपले यांनी केले तर नारायण राटवळ यांनी आभार मानले.