वार्ताहर/ केपे
श्री कोकणपाईक सप्तकोटिश्वर कल्चरल ग्रुप, किडमकारवाडा-मोरपिर्ला यांच्यातर्फे वर्षपद्धतीप्रमाणे श्री सप्तकोटिश्वर देवाची महापूजा व कला संगम हा कार्यक्रम आज सोमवार 12 रोजी होणार आहे. त्यानिमित्त दुपारी 12 व रात्री 8 वा. आरती होणार असून त्यानंतर नैवेद्य व महाप्रसाद होणार आहे.
मोरपिर्ला येथे आज होणारा कला संगम म्हणजे पारंपरिक गोव्याच्या ग्रामीण लोकसंस्कृतीची माहिती देणारे व्यासपीठ आहे. श्री कोकणपाईक सप्तकोटिश्वर कल्चरल ग्रुपच्या संघटन कौशल्याच्या आधारे सुरू करण्यात आलेल्या कला संगमने आता व्यापक रूप घेतले आहे, अशी माहिती कला संगमच्या आयोजन समितीचे अध्यक्ष दिनेश वेळीप यांनी दिली. ग्रामीण लोकसंस्कृती टिकवून ठेवण्याच्या हेतूने सुरू केलेला कला संगम यशस्वी होत आलेला असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे, असे आयोजन समितीचे सचिव आनंद वेळीप यांनी सांगितले.
संस्थेचे अध्यक्ष शाणू वेळीप म्हणाले की, श्री कोकणपाईक सप्तकोटिश्वर कल्चरल ग्रुप आणि कला व सांस्कृतिक खात्यांच्या संयुक्त विद्यमाने कला संगम-2022 चे आयोजन केलेले असून त्यात ग्रामीण भागांतील विविध लोककलांचे सादरीकरण होणार आहे. सर्व कलाकारांनी व भक्तांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. आज सकाळी 10 वा. उद्घाटन सोहळा झाल्यावर 10.30 वा. रांगोळी स्पर्धा, 11 वा. चित्रकला (पाचवी ते दहावीपर्यंत), 11.30 वा. झावळी विणणे, दुपारी 12 वा. फुलांची वेणी तयार करणे, 2 वा. फुगडी, 3 वा. वेशभूषा (13 वर्षांखालील), 4 वा. गरबा नृत्य, संध्याकाळी 6 वा. एकेरी नृत्य अशा स्पर्धा होतील.
रात्री 9 वा. समूहनृत्य सादरीकरण झाल्यावर 10.30 वा. समारोप सोहळा होणार असल्याचे संस्थेचे सचिव राजेंद्र वेळीप यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे खजिनदार दयेश वेळीप, सांस्कृतिक सचिव संजीव वेळीप, कला संगम आयोजन समितीचे खजिनदार महेश वेळीप, सदस्य उल्हास वेळीप व कृष्णा वेळीप हेही हजर होते.