रशियाकडून जोरदार हवाई हल्ले ः मोठे नुकसान
वृत्तसंस्था/ कीव्ह
युक्रेनच्या दक्षिण हिस्स्यात युद्ध आता धोकादायक वळण घेत आहे. रशिया सातत्याने हवाई हल्ले करत युक्रेनला मागे ढकलू पाहत आहे. रशियाने आता युक्रेनच्या बाखमुत शहराला स्वतःच्या हवाई हल्ल्यांमुळे बेचिराख केल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी म्हटले आहे. या हवाई हल्ल्यांमध्ये अनेक जण मारले गेल्याचे वृत्त आहे.
युक्रेनच्या डोनेट्स्क, लुहान्स्क प्रांतातील स्थिती सातत्याने गंभीर होत चालली आहे. बाखमुत, सोलेडार, मारयिंका आणि क्रेमिन्ना शहराचे रशियाच्या हल्ल्यांमुळे प्रचंड नुकसान झाल्याचे झेलेंस्की यांनी सांगितले आहे.
रशियाकडून रात्री उशिरा इराणकडून निर्मित कामिकाजे ड्रोनद्वारे युक्रेनवर हल्ले करण्यात येत आहेत. या हल्ल्यांमुळे ओडेसातील सुमारे 15 लाख लोकांना विजेशिवाय काळोखात राहणे भाग पडले आहे. ओडेसासह युक्रेनमधील खारकीव्ह, सुमी, डनिप्रोपेट्रोवेस्क, जपोरिज्जिया आणि खेरसॉनमध्येही हवाई हल्ले वाढले आहेत.
रशियाने शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांमध्ये सुमारे 20 हवाई हल्ले करत 60 रॉकेट्स डागली आहेत. या हल्ल्यांमध्ये 2 नागरिक मारले गेले असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत. रशिया हवाई हल्ल्यांद्वारे रुग्णालय, दुकाने आणि घरांना लक्ष्य करत असल्याचा आरोप आहे.
शत्रूच्या हस्तकांचा शोध
खेरसॉन शहरावर युक्रेनवर नियंत्रण मिळविले असले तरीही रशिया अद्याप मागे हटण्यास तयार नाही. मागील काही काळापासून रशियाने खेरसॉनमध्ये हवाई हल्ले वाढविले आहेत. तर रशियाच्या सैन्यासोबत मिळून कट रचणाऱया लोकांचा शोध युक्रेनचे सेन्य घेत आहे. खेरसॉनमध्ये रशियन हस्तकांचा शोध लावण्यासाठी अधिकारी आता सर्व लोकांची ओळखपत्रे तपासत आहेत. स्थानिक लोकांची चौकशी केली जात असून वाहनांची झडती घेतली जात आहे. खेरसॉनमध्ये युक्रेनच्या सैन्याने 130 रशियन हस्तकांना पकडले आहे.