वार्ताहर / पुलाची शिरोली
हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगांव ते तासगांव रस्त्ता मौजे वडगाव गावातून जातो. गावातील या मुख्य रस्त्यावर जास्त खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. तरी या रस्त्याचे पॅचवर्क करण्याची मागणी ग्रामस्थातून व प्रवाश्यातून होत आहे.
मौजे वडगाव ते मौजे तासगाव पेठवडगांव असा रस्ता दिड वर्षापूर्वी झाला आहे. नवीन रस्ता झालेल्या या रस्त्यावर मागील वर्षी चारच महिन्यात अनेक खड्डे पडले होते, त्या आशयाच्या बातम्या सर्व प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केल्याने रस्ता करणाऱ्या ठेकेदारांनी तात्काळ पॅचवर्क करून खड्डे भरले होते. मात्र या वर्षीच्या झालेल्या अतिवृष्टीने अनेक खड्डे या रस्त्यावर पडले आहेत. मौजे वडगावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरच जास्त लहान मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्याची चाळण झालेली असून खड्डयात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली आहे.
गावातील मुख्य रस्ताच खड्डामय झाल्याने गावातील तसेच प्रवाशी वर्गांना खड्डे चुकवीत प्रवास करावा लागतो आहे. या रस्त्त्यावरून मुरूम भरून जाणारी मोठी अवजड वाहने व ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली जात असल्याने या वाहनापासून रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या घरांना धोका निर्माण झाला आहे. या खडड्यामुळे ही वाहने पल्टी होण्याची शक्यता निर्माण झाली असून अपघात होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता करणाऱ्या ठेकेदारांना तात्काळ या रस्त्यावरील खड्डे मुजविण्यासाठी पॅचवर्क करण्याचे आदेश दयावेत अशी मागणी ग्रामस्थातून व प्रवाशी वर्गातून होत आहे.