सैन्यशासकाच्या विरोधात रस्त्यांवर उतरले लोक संचारबंदीची पर्वा नाही, देशात लोकशाही परतावी
वृत्तसंस्था/ यंगून
म्यानमारमध्ये 1 फेब्रुवारी रोजी सत्ता उलथविण्यात आल्यावर जनता आता पूर्ण शक्तिनिशी रस्त्यांवर उतरली आहे. सैन्याने देशातील बहुतांश शहरे आणि भागांमध्ये संचारबंदी लागू केली आहे, पण लोकांच्या उत्साहासमोर हतबल होत सैन्याला आता मूकदर्शक व्हावे लागत आहे. मंगळवार सकाळपासूनच लोक यंगून आणि उर्वरित शहरांमध्ये रस्त्यांवर उतरले आहेत. आम्ही आमच्या नजरेसमोर लोकशाही संपताना पाहू शकत नाही. संचारबंदीची पर्वा नाही, लोकशाही परत यावी असे काही निदर्शकांनी म्हटले
आहे.
मंडाले शहरात निदर्शकांना पांगविण्यासाठी पाण्याचा मारा करण्यात आला आहे. जमावाला हुसकावून लावण्यासाठी दोन गोळय़ा झाडण्यात आल्याचा दावा काही जणांनी केला आहे. तर पोलिसांनी 24 पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतले आहे. बागो शहरात हिंसक निदर्शने टाळण्यासाठी शहरातील वृद्धांसोबत पोलिसांनी मंगळवारी चर्चा केली आहे.
सत्तांतर केल्यावर सैन्याने 5 फेब्रुवारी रोजी देशाच्या कुठल्याही लोकांच्या एकत्र येण्यावर तसेच मोर्चावर बंदी घातली होती. तरीही आता विरोधाचा सूर आता तीव्र होऊ लागला आहे. रुग्णालये, शाळा आणि शासकीय कार्यालयांमध्ये कर्मचारी पोहोचले नसल्याचे समजते. यंगूनच्या ऐतिहासिक सुले पगोडानजीक सकाळपासूनच हजारो लोक पोहोचले आहेत.
हुकुमशाही नाही चालणार
मंगळवारी निदर्शने करणाऱया लोकांनी हातात फलक झळकविले होते. आमच्या नेत्या आंग सान सू की यांना त्वरित मुक्त केले जावे, देशात आता हुकुमशाही सहन केली जाणार नाही, लोकशाही लोकांचा हक्क आहे असे या फलकांवर नमूद होते. या जुलमामुळे लोक घाबरून घरात लपतील असा विचार सैन्य करत असल्यास तो त्याचा गैरसमज आहे. लोक आता रस्त्यांवर उतरले असून सैन्याला लोकशाहीवादी सरकार पुन्हा आणावे लागेल असे शिक्षिका थेइन विन यांनी म्हटले आहे. म्यानमारमध्ये इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे.