ऑनलाईन टीम / पुणे :
म्युकरमायकोसिस’बाबतची माहिती नागरिकांना व्हावी, याबाबत अधिक स्पष्टता असावी, या उद्देशाने एका स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पत्र लिहून केली आहे.
पुणे शहरात गेल्या काही दिवसांत म्युकरमायकोसिस या आजाराच्या रुग्णांची नोंद झालेली आहे. शिवाय ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र याबाबत नेमकी रुग्णसंख्या किती आहे? यातील उपचार किती रुग्ण घेत आहेत? किती रुग्ण बरे झाले? याबाबतची माहिती प्रसिद्ध केली जात नाही. त्यामुळे आगामी काळात नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्णय होऊ शकते. म्हणूनच याबाबत अधिक स्पष्टता असणे आवश्यक आहे. असेही मुळीक यांनी पत्रात म्हटले आहे.
स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याने याबाबत अधिक स्पष्टता येऊ शकेल. तसेच म्युकरमायकोसिस बाबतीत सामान्य नागरिकांना फारशी माहिती नाही. शिवाय मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमामधूनही याबाबत ठोस आकडेवारी उपलब्ध होत नाही. त्यामुळे नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्यास रुग्णसंख्या, उपाययोजना आणि आकडेवारी याबाबतीत अधिकची सुसूत्रता येईल.