प्रतिनिधी/ पणजी
विधानसभा अधिवेशनात विरोधी पक्षांतर्फे काल मंगळवारी चर्चेसाठी देण्यात आलेला म्हादई प्रश्नावरील स्थगन प्रस्ताव सभापती राजेश पाटणेकर यांनी नाकारला. विरोधी आमदारांनी याचा निषेध म्हणून सभागृहात घोषणाबाजी केली. त्या गोंधळातच सभापतींनी सरकारी दुरूस्ती विधेयके मांडण्यास मंजुरी दिली आणि एकदाचे कामकाज संपवून टाकले.
म्हादईचा विषय महत्त्वाचा असून त्यावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगो व अपक्ष आमदारांनी एकत्र येऊन स्थगन प्रस्ताव दिला होता. त्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी केली. तत्पूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संसदेत मान्यता देण्यात आलेले घटना दुरूस्ती विधेयक विधानसभेत मांडले आणि त्यास सर्वांनी मान्यता देण्याची सूचना केली. त्यास विरोधकांची मान्यता असल्याचे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी स्पष्ट केले आणि म्हादईचा स्थगन प्रस्ताव चर्चेसाठी घेण्याची मागणी केली.
उपमुख्यमंत्री आजगावकरांचा आग्रह सभापतींनी नाकारला
दरम्यान, त्या विधेयकावर बोलण्यासाठी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी आग्रह धरला आणि आवाज काढला. त्यावर बोलण्यास द्यावे अशी त्यांची मागणी होती. तेव्हा ते विधेयक फक्त मान्यता देण्यासाठी आहे. चर्चेसाठी नव्हे. त्यावर चर्चा करता येणार नाही, अशी समज सभापती पाटणेकर यांनी त्यांना दिली. कामत यांनीही आजगावकरांना समजावण्याचा प्रयत्न केला. नंतर मात्र आजगावकर शांत झाले तेव्हा विरोधी आमदारांनी म्हादई स्थगन प्रस्तावाचा विषय काढून त्यावर चर्चा करण्याची वारंवार मागणी केली. शेवटी त्यावर निर्णय देण्याचे पाटणेकर यांनी सांगितले.
खास अधिवेशन असल्याने स्थगन प्रस्ताव फेटाळला
म्हादई प्रकरणात गोवा राज्याला फसवण्यात आले असून राज्यपालांनी देखील तेच सांगितले असल्याचे सरदेसाई यांनी नमूद केले. राज्याचे घटनाप्रमुख असणाऱया राज्यपालांनी देखील तसे वक्तव्य केल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. तेव्हा स्थगन प्रस्तावावर निर्णय देताना पाटणेकर म्हणाले की, विजय सरदेसाई व इतर 9 सदस्यांनी म्हादईप्रश्नी स्थगन प्रस्ताव दिला असून तो मिळाला आहे. तथापि, हे अधिवेशन खास कारणासाठी बोलाविण्यात आलेले आहे. संसदेत मान्य झालेल्या दुरूस्ती विधेयकांना समंत करण्यासाठी हे अधिवेशन असून त्यात इतर विषय घेता येत नाहीत. त्यामुळे हा स्थगन प्रस्ताव नाकारत असून तो फेटाळल्याचा निर्णय सभापती पाटणेकर यांनी यावेळी जाहीर केला.
विरोधकांचा गोंधळ, जोरदार घोषणाबाजी
त्यानंतर विरोधी आमदार संतापले. त्यांनी जागेवर उभे राहून ‘आमची म्हादई आमका जाय’ अशी घोषणाबाजी करून तसे फलक समोर धरले. काँग्रेसपक्षाचे सर्व आमदार, गोवा फॉरवर्ड पक्षाचे सर्व आमदार, अपक्ष आमदार रोहन खंवटे, मगोचे आमदार सुदिन ढवळीकर अशा एकूण 10 आमदारांनी उभे राहून घोषणाबाजी करीत सभापतींच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. यावेळी राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव तटस्थ राहिले. त्या गोंधळातच सभापतींनी कामकाज आटोपले. फारसे कामकाज नसल्यामुळे सकाळच्या सत्रातच दुपारी 1 वाजेपर्यंत अधिवेशन संपुष्टात आले.