बस्तोडा पंचायतीची कारवाई
प्रतिनिधी / म्हापसा
बस्तोडा पंचायत क्षेत्रात तार नदीजवळील जंक्शनवर भाजी, मासे, घरगुती साहित्य आदी सामान घेऊन बसणाऱया सरपंच रणजित उसगावकर यांच्या पुढाकाराने कडक पोलीस बंदोबस्तात हाकलून देण्यात आले. काही स्थानिकांची भाजी व इतर सामान जप्तही करण्यात आले. ही कारवाई यापुढेही चालूच राहणार असल्याची माहाती बस्तोडा सरपंच उसगावकर यांनी दिली.
लॉकडाऊनच्या काळात येथील सुरू असलेले बेकायदेशीर गाळे तचे भाजी विक्रेत्यांची भाजी जप्त केली होती. कोरोना या महाभयंकर रोगाचा प्रसार देशभर होत असताना राज्यातही त्याचा फैलाव झाल्याने बस्तोडा गावात असा रुग्ण सापडू नये यासाठी सरपंच उसगावकर यांनी ही कारवाई हाती घेतली.
दरदिवशी मयडे, उसकई पालये, हळदोणा, म्हापसा, पर्रा, गिरी येथील 100 च्या आसपास नागरिक आपले सामान घेऊन या ठिकाणी विक्रीसाठी बसत असतात. त्यामुळे या भागात सकाळच्या वेळेत जणू मिनीबाजारच भरत आहे. यामुळे हे सामान खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दीही उसळू लागली होती. सोशल डिस्टन्स्टिंग पाळले जात नाही, मास्कचाही वापर 100 टक्के होत नाही. त्यामुळे सांभाव्य धोका ओळखून बस्तोडा पंचायतीतर्फे ही कारवाई हाती घेण्यात आली आहे. हे सर्व विक्रेते विनापरवाना बेकायदेशीररित्याच आपले सामान विक्री करण्यासाठी बसल्याचे आढळून आले. त्यामुळे ही कारवाई करणे अत्यावश्यक होते, असे बस्तोडा सरपंच रणजित उसगावकर तरुण भारतशी बोलताना म्हणाले.