मद्य विक्रीची 19 दुकाने सिलबंद
प्रतिनिधी / फोंडा
लॉकडाऊनच्या काळात दारु विक्रीवर पूर्णपणे बंदी असून फोंडा तालुक्यातील 19 मद्य विक्रीची दुकाने अबकारी खात्याकडून सिलबंद करण्यात आली आहेत. तसेच गेल्या दहा दिवसांमध्ये तीन ठिकाणी टाकलेल्या छाप्यात साधारण रु. 67 लाख 50 हजारांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. 22 एप्रिल रोजी फोंडय़ातील एका गोदामात बेकायदेशीररित्या साठविण्यात आलेला रु. 66 लाख 50 हजारांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला होता. केवळ फोंडय़ातीलच नव्हे तर संपूर्ण गोव्यातील ही मोठी धडक कारवाई मानली जाते.
14 एप्रिल रोजी फोंडा येथे केलेल्या कारवाईत रु. 81 हजारांचा मद्यसाठा तर त्यानंतर 19 एप्रिल रोजी शिरोडय़ात अन्य एका कारवाईत 20 हजारांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्री करणाऱया या तिनही आस्थापनांवर कारवाई सुरु असून त्यांचे विक्री परवाने निलंबित किंवा रद्द होण्याची शक्यता आहे. अबकारी खात्याने 22 रोजी फोंडा येथे केलेल्या कारवाईनंतर बेकायदेशीरित्या मद्यविक्री करणाऱयांचे धाबे दणाणले आहेत. फोंडा तालुक्यात दारुची घाऊक विक्री करणारी 12 दुकाने, 3 सुपर मार्केट तसेच 4 बाटलीबंद दारु विकणारी दुकाने सिलबंद करण्यात आल्याची माहिती फोंडा अबकारी कार्यालयाचे निरीक्षक दुर्गादास नाईक यांनी दिली. सध्या तालुक्यातील सर्व मद्यालये तसेच घाऊक व बाटलीबंद दारुची विक्री करणाऱया दुकानांवर आमची करडी नजर आहे. लॉकडाऊनच्या या काळात दारु विक्री होत असल्याचे सापडल्यास किंवा तशा तक्रारी आल्यास कडक कारवाईचे संकेत त्यांनी दिले आहेत.
सध्या राज्यात हुर्राक व फेणीचा हंगाम असला तरी अशा पारंपरिक दारु गाळपाच्या भट्टय़ांनाही ही बंदी लागू आहे. त्यामुळे अशा दारु भट्टय़ावरुन दारु विकण्यास कडक निर्बध घालण्यात आले आहेत. अशा अड्डय़ांवरुन दारु विकताना आढळल्यास कारवाई केली जाईल, असेही दुर्गादास नाईक यांनी सांगितले.
फोंडय़ातील सर्वांत मोठी कारवाई
22 एप्रिल रोजी लाकडाऊनच्या काळात फोंडा तालुक्यात दारु साठय़ाच्या गोदामावर केलेली गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठी कारवाई आहे. राज्यात घाऊक व किरकोळ दारुच्या विक्रीवर बंदी असतानाही अशाप्रकारे बेकायदेशीर साठेबाजी करणे गुन्हा आहे. जप्त केलेल्या या दारुच्या साठय़ात बियर, रम, वाईन, विस्की, तसेच देशी दारु मोठय़ाप्रमाणात सापडली आहे. दुर्गादास नाईक यांनी फोंडा अबकारी कार्यालयाचे निरीक्षक म्हणून हल्लीच ताबा घेतला असून त्यांची ही पहिली कारवाई आहे.