प्रतिनिधी /म्हापसा
कृतार्थ, म्हार्दोळ या संस्थेतर्फे हाती घेण्यात आलेल्या श्रीमद् भगवद्गीतेच्या मराठी ‘श्लोकबद्ध गीतासार’ प्रसार प्रकल्पाची माहिती देण्यासाठी संस्थेचे मार्गदर्शक प्राचार्य अनिल सामंत यांच्या अध्यक्षतेखाली गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती’ संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतीच बैठक झाली.
श्रीमद् भगवद्गीता हा अत्यंत मौलिक असा ग्रंथ असून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेले समुपदेशन म्हणून या ग्रंथाकडे नव्या नजरेने बघता येईल परंतु, आजच्या व्यस्त दिनचर्येत आकाराने मोठा असा हा ग्रंथ वाचणे, अभ्यासणे कठीण असल्याने कृतार्थ, म्हार्दोळ या संस्थेने छोटय़ा आकाराचा अठरा श्लोकी गीतासार मराठीत प्रकाशित केला असल्याचे प्राचार्य अनिल सामंत यांनी सांगितले.
श्रीमद् भगवद्गीतेच्या अठरा अध्यायांचा सारांश चार ओळींच्या अठरा श्लोकांत विविध वृत्तांमध्ये शब्दबद्ध केला असून तो गेय असल्याने सहज गुणगुणत कशाप्रकारे पाठ करता येईल, हे प्राचार्य सामंत यांनी सोदाहरणासह स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या तोंडी ही साररुपी गीता कशाप्रकारे येईल याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले. बैठकीस प्राचार्य गजानन मांदेकर व सर्व इतर शिक्षक उपस्थित होते.