प्रतिनिधी /फोंडा
म्हारवासडा-उसगाव येथे फॉच्युनर या अलीशान कारगाडीवरील चालकाच्या ताबा सुटल्याने ती म्हारुदेवाच्या कट्टय़ावर जाऊन धडकली. रविवारी सकाळी 8.30 वा. सुमारास हा अपघात झाला. एक पादचारी सुदैवाने या अपघातातून बचावला तर कारचालक प्रशांत शांतीलाल प्रभूदेसाई (41, रा. तळसाय-बोरी) हा किरकोळ जखमी झाला.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए 05 डी 8336 या क्रमांकाची ही कारगाडी फोंडय़ाहून म्हारवासडामार्गे उसगावच्या दिशेने जात होती. येथील श्री म्हारुदेव मंदिराजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ती मंदिराच्या कठडय़ावर जाऊन धडकली. यावेळी रस्त्याने चालत जाणाऱया एका पादचाऱयाला या गाडीची निसटती ठोकर लागली. रविवारच्या दिवशी या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी ये जा सुरु असते. सुदैवाने अपघाताच्यावेळी त्याठिकाणी एक पुजारी सोडल्यास अन्य कुणीही नव्हते.