आगामी काळात 21 हजार झाडांची रोपे लावण्याचा उपक्रम राबविणार
प्रतिनिधी /बेळगाव
महाराष्ट्र एकीकरण समिती केवळ निवडणुकीपुरतीच सक्रीय असते, हा काही जणांचा समज कोरोना आयसोलेशन सेंटरमुळे फोल ठरला आहे. म. ए. समितीने लोक सहभागातून सुरू केलेल्या आयसोलेशन सेंटरमधून 152 रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे हीच वैद्यकीय सेवा यापुढेही कायम राहण्यासाठी व गरजूंना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘म. ए. समिती आरोग्य सेवा केंद्र’ लवकरच सुरू केले जाणार असल्याची माहिती म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
म. ए. समिती संचालित कोरोना आयसोलेशन सेंटर रुग्णसंख्या घटल्याने सोमवारपासून बंद करण्यात आले. एकूण 42 दिवस सुरू असलेल्या या सेंटरमध्ये गरजू रुग्णांवर उपचार करण्यात आले. ज्या काळात रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नव्हते, त्या काळात म. ए. समितीने नागरिकांना आयसोलेशन सेंटरच्या माध्यमातून बेड उपलब्ध करून दिले. नागरिकांनीही समितीने दिलेल्या एका हाकेवर लाखो रुपयांचा निधी जमा करून आयसोलेशन सेंटर उभे केले. संजीवनी फौंडेशनच्या सविता नेगिनहाळ यांनी या कार्यात मोलाचा वाटा उचलल्याचे श्रीकांत कदम यांनी सांगितले.
नागरिकांची भरभरून मदत
आयसोलेशन सेंटरमधील रुग्णांना जीवनदीप फौंडेशन, महिला आघाडी, फ्रेंड फौंडेशन, मोहन चिगरे, मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांनी सहकार्य केले. या पुढील काळात म. ए. समितीच्या माध्यमातून 21 हजार झाडांची रोपे लावण्याच्या उपक्रमाला चालना दिली जाणार आहे. आयसोलेशन सेंटरसाठी नागरिकांनी भरभरून मदत दिली असून, प्रत्येक पैशाचा योग्य विनियोग करण्यात आला आहे. उर्वरित पैशाच्या जमा-खर्चाचा अहवाल नागरिकांना लवकरच दिला जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
लसीकरणात राजकारण करणे चुकीचेच
केंद्र सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लस प्रत्येक नागरिकाला मोफत दिली जात आहे. परंतु बेळगावमध्ये ही लस देण्यावरूनही राजकारण सुरू आहे. स्वतःचा व पक्षाचा बॅनर लावून लसीकरण केले जात आहे. सर्वसामान्यांना डावलून पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच लस देण्याचा अजब प्रकार बेळगावमध्ये सुरू आहे. हा प्रकार वेळीच न थांबल्यास या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा मदन बामणे यांनी दिला. यावेळी सचिन केळवेकर, मनोहर हुंदरे यांच्यासह म. ए. समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.