श्रीलंकन संघाविरुद्ध दुसरी टी-20 आज : इशान किशन, रोहित, श्रेयसकडून पुन्हा एकदा फटकेबाजीची अपेक्षा
धरमशाला / वृत्तसंस्था
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आज (शनिवार दि. 26) श्रीलंकेविरुद्ध दुसऱया टी-20 लढतीत आणखी एका एकतर्फी मालिकाविजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ सध्या 1-0 फरकाने आघाडीवर आहे. आजची लढत सायंकाळी 7 वाजता सुरु होईल.
गतवर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताला लवकरच गाशा गुंडाळावा लागला, ते धक्कादायक ठरले होते. मात्र, चार महिन्यांच्या आतच भारतीय संघाने युवा खेळाडूंच्या दमदार प्रदर्शनाच्या बळावर सातत्याने बाजी मारण्याचा सिलसिला सुरु केला आहे. ऑस्ट्रेलियातील टी-20 वर्ल्डकपला अद्याप सहा-एक महिन्यांचा कालावधी बाकी असला तरी रोहितच्या नेतृत्वाखालील मुख्य खेळाडू कोण असतील, हे जवळपास निश्चित झाले आहे.
विंडीजविरुद्ध झगडावे लागलेल्या युवा सलामीवीर इशान किशनने धडाकेबाज फलंदाजी साकारली असून स्ट्राईक रोटेट करण्याच्या निकषावर देखील तो उत्तम यश संपादन करु शकला आहे. आयपीएलमध्ये ज्या तडफेने फटकेबाजी केली, त्याचाच दाखला त्याने लंकेविरुद्ध पहिल्या लढतीत देखील दिला.
ऋतुराज गायकवाडला मनगटाची दुखापत झाली नसती तर तो किशनसमवेत सलामीला उतरला असता आणि रोहितने मधल्या फळीत फलंदाजीला उतरणे पसंत केले असते. आजही ऋतुराज तंदुरुस्त झाल्यास असेच चित्र दिसू शकते. दुखापतीमुळे ब्रेक घ्यावा लागल्यानंतर पुनरागमन करताना रोहित सहजपणे फॉर्ममध्ये परतला आणि आजही त्याच्याकडून धावांची आतषबाजी अपेक्षित असेल.
विश्रांती देण्यात आलेल्या विराट कोहलीच्या गैरहजेरीत तिसऱया स्थानी उतरण्याची संधी मिळाल्यानंतर श्रेयस अय्यरने जोरदार धडाका सुरु केला असून आजही तोच धडाका कायम राखण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. नव्याने तंदुरुस्त रविंद्र जडेजा फलंदाजीला बढतीवर पाठवण्याचा निर्णय परिस्थितीनुरुप घेतला जाणे अपेक्षित आहे. यापूर्वी, पुनरागमनवीर संजू सॅमसनला सलामीला संधी मिळाली नाही आणि येथे त्याला नव्याने प्रतीक्षा असेल.
भारतीय संघ गोलंदाजीच्या आघाडीवर सरस प्रदर्शन साकारत आला आहे. भारताने दीपक हुडासह एकूण 7 गोलंदाज आजमावले आणि ते सर्व किफायतशीर ठरले. वेंकटेश अय्यर महागडा ठरला. पण, त्याने लंकेला धक्केही दिले. धर्मगुरु दलाई लामांच्या या भूमीत भारताची सलग 10 टी-20 विजयाची घोडदौड संपुष्टात आणायचे असेल तर लंकेला विशेष प्रयास करावे लागतील, हे सुस्पष्ट आहे. आघाडी लाईनअपमधील फलंदाजांची हाराकिरी आणि आघाडीचे फिरकीपटू महिश तिक्षणा व वणिंदू हसरंगाची गैरहजेरी या बाबी लंकेला फटका देणाऱया ठरल्या.
प्रतिस्पर्धी संघ
भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, रविंद्र जडेजा, दीपक हुडा, वेंकटेश अय्यर, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रित बुमराह, यजुवेंद्र चहल, ऋतुराज गायकवाड, रवि बिश्नोई, अवेश खान, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.
श्रीलंका ः पथूम निसांका, कामिल मिशरा, चरिथ असलंका, दिनेश चंडिमल (यष्टीरक्षक), जनिथ लियानगे, दसुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, दुष्मंता चमीरा, प्रवीण जयविक्रमा, जेफ्री व्हॅन्डरसे, लहिरु कुमारा, दनुष्का गुणतिलका, अशियन डॅनिएल, शिरॅन फर्नांडो, बिनुरा फर्नांडो.
सामन्याची वेळ ः सायं. 7 वा.
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, हॉटस्टार.