यमकनमर्डी पोलिसांची कारवाई : संशयित दोघे गडहिंग्लज तालुक्यातील
वार्ताहर/ यमकनमर्डी
यमकनमर्डी येथील गोळीबार प्रकरणी तिसऱया संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. युवराज सुरेश नाईक (रा. मुत्नाळ, ता. गडहिंग्लज) असे सदर आरोपीचे नाव असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल, एक मॅगजिन आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणातील प्रमुख आरोपी विनायक होरकेरी याला सदर व्यक्तीने गावठी पिस्तूलचा पुरवठा केला होता.
याबाबत माहिती अशी, 16 डिसेंबर रोजी यमकनमर्डी येथे भरमा दुपदाळी यांच्यावर गोळीबार झाला होता. दरम्यान, पोलिसांनी घटनेचा तपास हाती घेत 1 जानेवारीला प्रकरणातील मुख्य आरोपी विनायक होरकेरी (रा. यमकनमर्डी) याला अटक केली होती. तसेच त्याच्याकडून 1 पिस्तूल जप्त करून न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. दरम्यान, याचा अधिक तपास करीत पोलिसांनी घटनेतील दुसऱया आरोपीला 2 जानेवारीला अटक केली आहे. निखिल वसंत भासले (रा. दुडगा, ता. गडहिंग्जल) असे त्याचे नाव आहे. त्यानंतर अटकेतील संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी युवराज नाईक याला अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर केले.
गोकाकचे डीवायएसपी जावेद इनामदार आणि सीपीआय हुक्केरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी एल. वाय. किलारी, व्ही. आर. नाईक, एस. ए. शेख, एम. व्ही. नावी, आर. एस. हुच्चरेड्डी, एच. बी. करोशी, एस. एन. अरबळ्ळी यांच्या पथकाने सदर कारवाई केली. या कारवाईबद्दल जिल्हा अतिरिक्त पोलीस वरिष्ठाधिकारी अमरनाथ रेड्डी आणि एसपी लक्ष्मण निंबरगी यांनी पथकाचे कौतुक केले.