हुबळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची माहिती : सर्व तयारी पूर्ण
वार्ताहर/ हुबळी
जिल्हय़ात आठवडय़ाभरात कोरोना लस येण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात धारवाड जिल्हय़ातील 22 हजार आरोग्य कर्मचाऱयांना लस देण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. हुबळी किम्स रुग्णालयात शुक्रवारी कोरोनावरील लसीचे ड्राय रन (रंगीत तालीम) झाले. याची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, आरोग्य खात्याच्या मार्गसूचीनुसार जिल्हय़ात 110 लसीकरण केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत. जिल्हय़ातील सुसज्जित रुग्णालयात लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. लसीकरणानंतर कोणतेही दुष्परिणाम दिसून आल्यास त्याचठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात राखीव बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरणासाठी प्रत्येक केंद्रामध्ये 5 जणांचे पथक काम करणार असून त्यांना सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले आहे. लस घेणाऱया आरोग्य कर्मचाऱयांची संपूर्ण माहिती घेण्यात आली असून खासगी रुग्णालयातील कर्मचाऱयांची नावे यादीत नसल्यास त्यांना संस्थेमार्फत नावनोंदणी करण्यास संधी देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
किम्स रुग्णालयात 10 लसीकरण केंद्रांची स्थापना करण्यात येणार असून याचठिकाणी रुग्णालयातील सर्व कर्मचाऱयांना लस दिली जाईल. प्रत्येक केंद्रामध्ये दररोज 100 जणांना लस दिली जाणार आहे. खात्याच्या मार्गसूचीनुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱया टप्प्यात कोरोना वॉरियर्स, 50 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार आहे.
पोलीस, भारतीय सेनेसह संरक्षण दलात कार्यरत असलेल्यांची माहिती संग्रहित केली जात आहे. जिल्हय़ात 40 ते 50 हजार जण लसीकरणासाठी नोंदणी करण्याची अपेक्षा आहे. नोंदणी केलेल्यांनी स्व-इच्छेने लस घ्यावी. कोणताच दबाव नाही. नोंदणीवेळी अडथळा निर्माण झाल्यास व्यवस्थापन विभागाला संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱयांनी केले.
यावेळी किम्स सचिव डॉ. रामलिंगप्पा अंटरतानी, डीएचओ डॉ. यशवंत मदीनकर, किम्स वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुणकुमार, डॉ. लक्ष्मीकांत आदी उपस्थित होते.