वृत्तसंस्था/ गौहत्ती
2022 च्या आयसीसीच्या 19 वर्षाखालील वयोगटाच्या विश्व युवा चषक क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविणाऱया भारतीय संघाचे नेतृत्त्व करणाऱया यश धुलने येथे झालेल्या रणजी सामन्यातील दोन्ही डावात शानदार शतके झळकविली. दिल्ली आणि तामिळनाडू यांच्यातील च गटातील चार दिवसांचा इलाईट रणजी सामना अनिर्णित अवस्थेत राहिला. यश धुलने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पणातच दोन्ही डावात शतके नोंदविण्याचा पराक्रम केला. असा पराक्रम करणारा तो भारताचा तिसरा फलंदाज आहे.
या सामन्यात दिल्लीने पहिल्या डावात 452 धावा झळकविल्या. यश धुलने 113 धावांचे योगदान देत शतक झळकविले. त्यानंतर तामिळनाडूने पहिल्या डावात 494 धावा जमवित 42 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर दिल्लीच्या दुसऱया डावात सलामीला फलंदाजी करताना यश धुलने 200 चेंडूत 13 चौकारासह शतक पूर्ण केले. 2022 च्या रणजी क्रिकेट हंगाम दोन टप्प्यात 62 दिवसांच्या कालावधीत खेळविला जात आहे. एकूण 64 सामने होणार आहेत. ही स्पर्धा इलाईट आणि प्लेट गटामध्ये खेळविली जात आहे. इलाईट गटातील चार संघ तसेच प्लेट गटातील सहा संघ यांच्यात हे सामने खेळविले जात आहेत. इलाईट विभागातील प्रत्येक गटातील एक संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरेल.