खासदार अमोल कोल्हेंपेक्षा राजेंनी बाजी मारल्याचा कार्यकर्त्यांचा दावा
प्रतिनिधी/ सातारा
खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्ताने देगाव येथे बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. केवळ बैलगाडी शर्यतीमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्याप्रमाणे घोडयावर बसून शर्यतीपुढे न मिरवता खासदार उदयनराजेंनी चक्क शर्यतीच्या बैलगाडींची दावी हातात धरुन सारथ्य केले. डोक्याला फेटा अन् गळय़ात फडय़ा घालून त्यांचे शर्यतीच्या बैलगाडीत विराजमान झाल्याने कोल्हेंच्यापेक्षा राजेंनीच बाजी मारल्याचे उपस्थित कार्यकर्त्यांनी मीडियाजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या.
बैलगाडी शर्यतींना बंदी टाकण्यात आलेली होती. नुकतीच त्यावरील बंदी उठवण्यात आली आहे. त्यानंतर प्रथमच सातारा जिह्यात बैलगाडीच्या शर्यती परवानगीने खासदार उदयनराजेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या स्पर्धेच्या ठिकाणी खासदार उदयनराजेंनी सायंकाळी हजेरी लावली. त्यांचे एन्ट्री होताच कार्यकर्त्यांनी एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज अशी घोषणा करत स्वागत केले. कार्यकर्त्यांनी लगेच त्यांना बैलगाडीमध्ये चढण्याचा आग्रह केला. खासदार उदयनराजेंच्या डोक्याला फेटा कार्यकर्त्यांनी बांधला अन् गळय़ात फडय़ा टाकत बैलगाडीची दावी हातात घेतली. स्वतः बैलगाडी चालवल्याने एक वेगळाच कार्यकर्त्यांमध्ये आणि शर्यतीमध्ये उत्साह संचारला होता.