एरवी यष्टीरक्षण हा ‘थँकलेस जॉब’ मानला जातो. पण, कोलकाता नाईट रायडर्सचा दिनेश कार्तिक राजस्थान रॉयल्सविरुद्ध करा वा मरा धर्तीवर खेळवल्या गेलेल्या आयपीएल साखळी सामन्यात उत्तम यष्टीरक्षणाच्या बळावर संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. कार्तिकने या लढतीत यष्टीमागे 4 झेल घेतले आणि आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक झेलचा धोनीचा विक्रमही मोडीत काढला. कार्तिकने या लढतीत जे झेल घेतले, त्यात बेन स्टोक्सचा घेतलेला झेल सर्वात लक्षवेधी ठरला.
दिनेश कार्तिकच्या खात्यावर आता आयपीएलमध्ये 110 झेल नोंदवले गेले असून उर्वरित सामन्यात यात आणखी भर घालण्याची संधी त्याच्याकडे असणार आहे. चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार-यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने आयपीएल इतिहासात 109 झेल घेतले आहेत. मात्र, या हंगामातील चेन्नईचे 14 सामने संपलेले आहेत आणि त्यांचे आव्हानही संपुष्टात आले असल्याने धोनीला तूर्तास यात आणखी भर घालण्याची संधी नसेल.
यानंतर आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱया यष्टीरक्षकांच्या यादीत पार्थिव पटेल 66 झेलांसह तिसऱया, नमन ओझा 65 झेलांसह चौथ्या तर रॉबिन उत्थप्पा 58 झेलांसह पाचव्या स्थानी आहेत.
दरम्यान, कार्तिकने बेन स्टोक्सचा डावीकडे झेपावत घेतलेला अप्रतिम झेल सोशल मीडियामध्येही विशेष चर्चेत राहिला. कार्तिकच्या अव्वल दर्जाच्या क्षेत्ररक्षणामुळेच स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाला पराभवाचा जबरदस्त झटका सोसावा लागला. 192 धावांचा पाठलाग करताना स्टोक्स हा राजस्थान रॉयल्सचा सर्वात महत्त्वाचा मोहरा होता आणि त्याचाच झेल कार्तिकने टिपत विजयाच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला.
स्टोक्सने यावेळी पॅट कमिन्सच्या बाहेर जाणाऱया उसळत्या चेंडूला छेडण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. आपल्या डावीकडे वळत जमिनीपासून 3 इंच वर झेपावून झेल घेणे खूपच आव्हानात्मक, कठीण होते. पण, दिनेश कार्तिक पूर्ण झेपावला आणि दोन बोटात चेंडू अलगद विसावल्यानंतर हा अप्रतिम झेल साकारला गेला. कार्तिकने अप्रतिम झेल टिपल्यानंतर समालोचन कक्षातील लंकेचा दिग्गज माजी यष्टीरक्षक कुमार संगकारा म्हणाला, ‘त्या झेलावर ना आम्ही विश्वास ठेवू शकलो, ना बेन स्टोक्स’!
इरफान पठाणने दिनेश कार्तिकने घेतलेल्या 4 झेलांची तुलना पक्षाशी केली. ‘आजवर आम्ही फक्त ऑस्ट्रेलियातील क्रिकेट मैदानावरच पक्षी पाहिले होते’, असे ट्वीट इरफानने केले.