नवी दिल्ली/प्रतिनिधी
देशात पहिल्या टप्प्यात कोरोना काळात काम केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरु आहे. दरम्यान मार्च महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून ५० वर्षाहून अधिक वयोगटातील लोकांसाठी कोरोना लसीकरणाची सुरुवात होऊ शकते, असं केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरण अभियान सुरू करण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत ५० लाख लोकांना लस देण्यात आली आहे.
सध्या सात लसींवर काम सुरू आहे. यातील तीन लसी क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. तर दोन लसी ट्रायलच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात, तर दोन लसी प्री-क्लिनिकल टप्प्यात आहेत. कोरोना लसीकरण अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. त्यानंतर दोन कोटी प्रथमदर्शी कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल, अशी माहिती हर्षवर्धन यांनी दिली.
फ्रंटलाईन वर्कर्ससाठी लसीकरणाचं काम २ फेब्रुवारीपासून सुरू झालं आहे. तर ५० वर्षांहून अधिक वयोगटातील लोकांना मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून लस देण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं.