केएससीए ए डीव्हिजन क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना व धारवाड विभागीय क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ए डीव्हिजन क्रिकेट स्पर्धेत बुधवारी युनियन जिमखाना अ संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब अ संघाचा 50 धावानी पराभव करून 4 गुण मिळविले. 84 धावा व 4 बळी असे अष्टपैलू योगदान देणाऱया अष्टपैलू दीपक राक्षे याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
ऑटोनगर येथील केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या आजच्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात सर्वबाद 259 धावा केल्या. सलामीवीर दीपक राक्षेने 4 षटकार व 10 चौकारासह 84, वैष्णव संघमित्राने 1 षटकार 4 चौकारासह 47, वृषिकेश रजपूतने 4 चौकारासह 29, प्रवीण हिरेमठने 4 चौकारासह 26, अमय भातकांडेने 24 तर सर्फराज मुल्लाने 20 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे स्वयं अप्पण्णावरने 29 धावात 2, शुभम गौंडाडकरने 35 धावात 2 तर पार्थ पाटील, अमर घाळी, आकाश कटांबळे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाचा डाव 42 षटकात सर्वबाद 209 धावात आटोपला. त्यात पार्थ पाटीलने 3 षटकार 5 चौकारासह 53, आदेश माळीने 5 चौकारासह 43, सुदीप सातेरीने 4 चौकारासह 33, ओमकार वेर्णेकरने 21, दर्शन मयेकरने 13 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे दीपक राक्षेने 26 धावात 4, अमय भातकांडेने 7 धावात 2, नंदन शिंदेने 45 धावात 2 तर श्रेयश व वैष्णव संघमित्र यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.