वृत्तसंस्था/ कराची
माजी कर्णधार युनूस खानने मंगळवारी पाक क्रिकेट संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाचा त्याग केल्याची घोषणा करून पाक क्रिकेट वर्तुळाला अनपेक्षित धक्का दिला. युनूस खानने स्वतःहून हे पद सोडत असल्याचे सांगण्यात आले. पीसीबीने युनूस खानचा निर्णय मान्य केला आहे. दरम्यान राजीनाम्याचे कारण समजू शकलेले नाही.
पाकचा क्रिकेट संघ 25 जून रोजी इंग्लंडच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयामध्ये उभय संघात तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळविले जाणार आहेत. या मालिकानंतर पाकचा संघ विंडीजच्या दौऱयावर जाणार आहे. पाक संघाचा विंडीज दौरा 21 जुलै ते 24 ऑगस्ट दरम्यान राहील. या दौऱयात पाच टी-20 सामने आणि दोन कसोटी सामने सामने खेळविले जाणार आहेत. आता युनूस खानच्या राजीनाम्यामुळे पाकचा क्रिकेट संघ इंग्लंडच्या दौऱयावर फलंदाजी प्रशिक्षकविना जाणार असल्याचे पीसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले. मात्र विंडीज दौऱयापूर्वी दुसऱया फलंदाज प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल, असे पीसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले. युनूस खानने आपल्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये पाकतर्फे सर्वाधिक धावा नोंदविण्याचा विक्रम केला आहे. त्याने कसोटीत 10,000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. 2007 साली युनूस खान आणि पीसीबी यांच्यात काही मतभेद निर्माण झाल्याने त्याने चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत पाक संघाचे नेतृत्व नाकारले होते. पीसीबीकडून युनूस खानला अपमानास्पद वागणूक मिळाल्याने त्याने पीसीबीकडून जाहीर केलेले रोख रकमेचे बक्षीस नाकारले होते.