लस उपलब्ध होण्यापूर्वी स्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती
जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी युरोपमध्ये पुढील वर्षी महामारीची तिसरी लाट येण्याचा इशारा दिला आहे. युरोपच्या काही देशांमध्ये याची दुसरी लाट दिसून येत आहे, यादरम्यान अनेक देशांमध्ये रुग्ण वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.
युरोपची स्थिती पाहता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक आहे. सध्या पूर्ण जगाच्या नजरा लसीवर केंद्रीत आहेत, परंतु त्यापूर्वीच युरोपची स्थिती बिघडू शकते. उन्हाळय़ात युरोपमध्ये कोविड-19 ची पहिली लाट दिसून आली होती. तर आता दुसरी लाट सुरू आहे. या कालावधीत युरोप आवश्यक सुविधा निर्माण करण्यास अपयशी ठरल्याचे नाबारो म्हणाले.
वेगाने वाढते संक्रमण
अशा प्रकारच्या विषाणुमुळे संक्रमणाची संख्या केवळ 7 दिवसांमध्ये 8 पटीपर्यंत वाढू शकते. तर पुढील 7 दिवसांमध्ये हे प्रमाण 40 पट अधिक होऊ शकते. प्रतिबंधाचे योग्य उपाय न केल्यास याचा दर त्यापुढेही जाऊ शकतो. आशियाई देशांमधील लोकांनी नियमांचे कठोर पालन चालविले असल्यानेच तेथे संक्रमण घटल्याचे नाबारो यांनी म्हटले आहे.
आशियात नियमांचे पालन
आशियाई देशांनी घाईगडबडीत काही केले नाही, टाळेबंदी लागू केल्यावर तेथे रुग्ण कमी होण्याची प्रतीक्षा करण्यात आली, तर युरोपमध्ये टाळेबंदी हटविण्यावरून घाई करण्यात आली, ज्याचा फटका बसत आहे. नियमांचे कुठल्याही स्थितीत पालन करावे लागेल हा संदेश यातून मिळाला आहे.