प्रतिनिधी/ सातारा
गुरुवारी सातारा शहरात काही तरुणांनी सत्ताधारी पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर तोडफोड केली असावी, शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाबाहेर शेणी पेटवल्या असाव्यात. तो त्यांनी राग व्यक्त केला आहे. तो राग योग्य आहे. परंतु त्या युवकांच्या कुटूंबियांना धमकी देणे आमदार शशिकांत शिंदे यांना न शोभणारे आहे, अशी जोरदार तोफ डागत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील म्हणाले, त्या युवकांच्या केसाला धक्का लागता कामा नये, असा इशाराच त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना दिला आहे.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार नरेंद्र पाटील बोलत होते. ते म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांनातर महाराष्ट्रमध्ये मराठा समाजामध्ये संतापाची भावना निर्माण झालीय. राज्यभर आंदोलने झाली. त्यात सातारमध्ये काही तरुणांनी राग व्यक्त केलेला आहे. तो राग योग्य आहे. यदा कदाचित त्यांनी असे आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या घरासमोर शांतपणे आंदोलन केले असते तरी चालले असते.
परंतु युवकांच्या आंदोलनानंतर विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी त्या युवकाच्या घरी जाऊन दादागिरीची भाषा केलेली आहे. ही भाषा त्यांना शोभणारी नाही. ते युवक कोणत्या पक्षाचे नाहीत. कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी केलेले नाही. ते उत्स्फूर्तपणे करत आहेत आणि जर अशा लोकांना त्रास होत असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक सत्ताधारी आमदारांनी काळजी करणे गरजेच आहे. तुमच्या चार चार पिढय़ा बसून खाऊ शकतात. तुमचे कारखाने आहेत, तुमचे उद्योग आहेत. तुमचे पतपेढय़ा आहेत. पण जो शेतकरी मराठा आहे त्याच अस्तित्व कुठे तरी आरक्षणामुळे येणार होत. त्या तरुणांनी राग व्यक्त केला तो योग्य आहे. पोलिसांनी याची चौकशी करावी, व्हिडीओ तपासावे, ज्या व्हिडीओमध्ये त्या युवकांच्या परिवाराला धमकी दिली आहे त्याची तपासणी करावी. यदा कदाचित त्या मुलांच्या केसाला धक्का लागला तर मराठा समाज हा कोणाला ही सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांना माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.