प्रतिनिधी / सातारा
एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीला चेहऱयावर ऍसिड टाकण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना सातारा शहरात घडली होती. दोन दिवसांपूर्वी युवतीने तक्रार दिली होती. त्यातील संशयित आरोपी असलेल्या युवकाला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे. विक्रम बाळकृष्ण निपाणे (रा. महादरे, ता. सातारा) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.
सातारा येथील एका महाविद्यालयात 27 वर्षीय युवती शिक्षण घेत आहे. विक्रम निपाणे हा गेल्या दहा वर्षांपासून त्या युवतीचा पाठलाग करत होता. तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्या सोबत लग्नग्न करायचे आहे, अशी तो युवतीला गळ घालत होता. मात्र संबंधित युवतीने त्याला नकार दिला. यामुळे निपाणे याने तू जर माझ्यासोबत लग्नग्न केले नाहीस, तर बघ मी काय करतो. तुझ्या तोंडावर ऍसिड टाकतो, बघतो तुझ्याबरोबर कोण लग्न करतोय ते, अशी धमकी त्याने त्या युवतीला दिली. या प्रकारानंतर घाबरलेल्या युवतीने सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन निपाणेच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱयांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन संशयित युवकाला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम या गुन्हय़ाचा अधिक तपास करत आहेत.