अजित कुमार, अभिषेक सिंग, पवन सेहरावत यांचे चमकदार प्रदर्शन
वृत्तसंस्था/ बेंगळूर
प्रो कबड्डी लीगमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात युवा रायडर व्ही. अजित कुमार व अभिषेक सिंग यांच्या चमकदार कामगिरीच्या बळावर यू मुम्बाने जयपूर पिंक पँथर्सवर 37-28 अशी मात केली तर बेंगळूर बुल्सने हरियाणा स्टीलर्सचा 42-28 असा मोठा पराभव केला. बेंगळूरच्या पवन सेहरावतने 22 रेडपॉईंट मिळविले.
यू मुम्बासाठी अजित कुमारने 14 रेड्समध्ये 11 गुण मिळविले तर अभिषेकने 22 रेड्स टाकत 10 गुण मिळवून आपल्या संघाला या मोसमातील दुसरा विजय मिळवून दिला. जयपूर पिंक पँथर्ससाठी अर्जुन देशवालने चमक दाखविताना 14 गुण मिळविले. पण त्याला इतरांकडून चांगली साथ मिळाली नाही. यू मुम्बाने नाणेफेक जिंकून पिंक पँथर्सला प्रथम चढाई करण्याची संधी दिली. प्रारंभी दोन्ही संघांनी सावध खेळ केल्याने मोठय़ा झटापटी पहावयास मिळाल्या नाहीत. एका चढाईत अभिषेक बाद झाल्यानंतर पिंक पँथर्सने 2-1 अशी किंचित आघाडी घेतली. नंतर ती 5-4 अशी केली. अजित कुमारने सुपर रेड टाकत नंतर मुंबईला 7-5 असे आघाडीवर नेले. यानंतर मात्र मुंबईने मागे वळून पाहिले नाही. अजित कुमारला लय सापडल्यानंतर हवे तसे गुण मिळविण्यास सुरुवात केली. त्याला अभिषेक सिंगकडून उत्कृष्ट साथ मिळाली. चपळता दाखवत अजित प्रतिस्पर्धी डिफेंडर्सच्या तावडीतून शिताफीने सुटका करून घेताना दिसत होता. त्याने पिंक पँथर्सची बचावफळी पूर्ण खिळखिळी करून सोडली. पिंक पँथर्सला ऑलआऊट करीत मुम्बाने 12-7 अशी बढत केली. पिंक पँथर्सने मुसंडी मारण्यासाठी सर्व प्रयत्न करून पाहिले. पण त्यांना यश मिळाले नाही. मध्यंतराला मुंबईने 21-12 अशी आघाडी मिळविली.
उत्तरार्धातही मुंबईने वर्चस्व गाजवले आणि प्रारंभीच ऑलआऊट करीत 25-13 अशी आगेकूच केली. देशवालने जयपूरसाठी सुपर 10 मिळविले तर मुंबईच्या अजितनेही सुपर टेन मिळविताना अनुभवी धर्मराजला बाद करीत आपली आघाडी 28-16 अशी वाढविली. फझल अत्राचलीने दीपक हुडाला टॅकलमध्ये बाद केले. त्यामुळे अर्जुन देशवालवरच सर्व जबाबदारी पडली. त्याने प्रयत्न केले. पण त्याला साथ न मिळाल्याने जयपूरचा पराभव तो टाळू शकला नाही.
बेंगळूर बुल्सचा मोठा विजय
हरियाणा स्टीलर्सने जोरदार संघर्ष केला असला तरी अखेर त्यांना बेंगळूर बुल्सकडून 28-42 अशा गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. विकास कंडोलाने स्टीलर्ससाठी सर्वोत्तम कामगिरी करताना 7 रेडपॉईंट मिळविले. स्टीलर्सने प्रारंभी 4-2 अशी शानदार सुरुवात केली होती. पण 9 व्या मिनिटाला बेंगळूरने त्यांना ऑलआऊट करीत 10-5 अशी पाच गुणांनी आघाडी घेतली. स्टीलर्सने झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण बेंगळूर गुण मिळवित राहिल्याने त्यांची आघाडी वाढत राहिली. 13 व्या मिनिटाला कंडोलाने सुपर रेड टाकले तरी बेंगळूरने 15-8 अशी आघाडी राखली आणि बेकपर्यंत ती 19-13 अशी केली होती. उत्तरार्धातही बेंगळूरने आपली आघाडी वाढवत नेली. 29 व्या मिनिटाला बेंगळूरने पुन्हा एकदा ऑलआऊट करीत 31-18 अशी 13 गुणांची भक्कम आघाडी मिळविली. स्टीलर्सने जोरदार प्रयत्न केले. पण बुल्सने आघाडी राखत विजय साकार केला.
आजचे सामने
1) यू मुम्बा वि. यूपी योद्धा
वेळ ः रात्री 7.30 वा.
2) बेंगळूर बुल्स वि. तेलुगू टायटन्स
वेळ ः रात्री 8.30 वा.
3) दबंग दिल्ली वि. तामिळ थलैवाज
वेळ ः रात्री 9.30 वा.
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क.
प्रो कबड्डी लीग गुणतक्ता (30 डिसेंबरअखेर)
क्रम संघ सा जय हार टाय गुण
1 दबंग दिल्ली 4 3 0 1 18
2 बेंगळूर बुल्स 4 3 1 0 15
3 यू मुम्बा 4 2 1 1 14
4 गुजरात जायंट्स 4 1 1 2 12
5 पाटणा पायरेट्श 3 2 1 0 11
6 बंगाल वॉरियर्स 4 2 2 0 11
7 जयपूर पिंक पँथर्स 4 2 2 0 11
8 यूपी योद्धा 4 1 2 1 10
9 हरियाणा स्टीलर्स 4 1 3 0 7
10 तामिळ थलैवाज 3 0 1 2 6
11 तेलुगू टायटन्स 3 0 2 1 5
12 पुणेरी पलटन 3 1 2 0 5.