बेंगळूर/प्रतिनिधी
बी.एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत चर्चा सुरू आहे. सोमवारी दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या राजीनाम्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, नवा मुख्यमंत्री कोण याबाबत उत्सुकता आहे. मात्र येडियुरप्पांच्य या राजीनाम्याने अनेकजण दुखावले गेले आहेत. येडियुरप्पांच्या राजीनाम्याचा त्यांच्या समर्थकांवरही मोठा परिणाम झाल्याचं पहायला मिळत आहे. चामराजनगर येथे राहणाऱ्या एका तरुणाने येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्याने निराश होऊन आत्महत्या केलीय. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. या तरुणाच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. येडियुरप्पांनीही या तरुणाच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव रवि असं असून तो ३५ वर्षांचा होता. येडियुरप्पा यांनी कन्नडमध्ये याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. “मी राजीनामा दिल्याने रविने आत्महत्या केली ही बातमी माझ्यासाठी फार दु:खद आहे. राजकारणामध्ये चढ उतार येत असतात. त्यामुळे एखाद्याने आपले प्राण द्यावे हे कोणत्याप्रकारे स्वीकारता येणार नाही. ज्या दु:खामधून त्याचं कुटुंब जात आहे त्याची कोणत्याही प्रकारे भरपाई करता येणार नाही,” असं येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.