कारण जाणून घेतल्यावर व्हाल दंग
कॅनडात एक छोटे शहर असून तेथे लोक स्वतःची कार लॉक न करताच सोडून जातात. म्हणजेच स्वतःच्या कारला लॉक करत नाहीत. याचे कारण अत्यंत अजब आहे. कॅनडाचे चर्चिल हे एक छोटेसे शहर असून ते हडसन बेच्या पश्चिम काठावर स्थित आहे.
येथील लोक कुठलीही चिंता आणि भीतीशिवाय स्वतःची कार लॉक न करता सोडून जातात हे याचे वैशिष्टय़ आहे. कार पार्किंगमध्ये असो, किंवा अन्यत्र कुठे कार नेहमीच अनलॉक असते. अशा स्थितीत तेथे कार चोरीच्या घटना का घडत नाहीत असा विचार नक्कीच मनात येतो.
ध्रूवीय अस्वल कारणीभूत
चर्चिल शहर हे ध्रूवीय अस्वलांसाठी ओळखले जाते. या शहरात ध्रूवीय अस्वलांची संख्या अधिक आहे. याचमुळे याला जगाची ध्रूवीय अस्वलांची राजधानी म्हटले जाते. कार लॉक न करण्याचे कारण ध्रूवीय अस्वलांशीच निगडित आहे. निरागस आणि प्रेमळ दिसणारे ध्रूवीय अस्वल प्रत्यक्षात अत्यंत आक्रमक असते. त्यांच्याकडून माणसांवर हल्ला करण्यात येतो, यात संबंधिताचा जीव देखील जाऊ शकतो. अशा स्थितीत येथील लोक स्वतःची कार लॉक न करताच सोडून देतात. ध्रूवीय अस्वल समोर आल्यास कारमध्ये लपता येईल किंवा कारद्वारे तेथून अन्यत्र जाता येईल असा यामागे विचार असतो.
स्वतःचे रक्षण
कार लॉक न करणे ही कायदेशीरदृष्टय़ा आवश्यक नाही. परंतु लोक केवळ माणसुकी आणि इतरांची सुरक्षा विचारात घेऊन असे करतात. ध्रूवीय अस्वलाचा आकार सायबेरियन वाघापेक्षाही मोठा असू शकतो आणि ते अत्यंत हिंस्त्र असतात. अस्वलांच्या या प्रजातीला सर्वात धोकादायक मांसाहारी प्राणी म्हणून ओळखले जाते. ध्रूवीय अस्वलापासून वाचण्यासाठी कुठल्याही प्रकारची वेगवान हालचाल करू नये. हळूहळू त्याच्यासमोरून हटावे असे सांगण्यात येते.