द डॉनच्या संपादकाने ठरविले कार्यक्षम सरकार : कोरोना संकटकाळातील उपाययोजनांचा केला उल्लेख
वृत्तसंस्था / इस्लामाबाद
पाकिस्तानातील इंग्रजी वृत्तपत्र ‘द डॉन’चे संपादक फहद हुसैन यांनी कोरोना महामारीच्या दरम्यान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उचललेल्या पावलांचे तोंडभरून कौतुक केले आहे. हुसैन यांनी ट्विटरवर योगी आणि पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारच्या कामगिरीची तुलना केली आहे. हुसैन यांनी योगी आदित्यनाथांची कामगिरी इम्रान सरकारपेक्षा सरस असल्याचे नमूद केले आहे.
सावधपणे आलेख पाहिल्यास पाकिस्तानची लोकसंख्या घनता उत्तरप्रदेशपेक्षाही कमी आहे. तर दरडोई उत्पन्न अधिक आहे. तरीही उत्तरप्रदेशने टाळेबंदीचे कठोर पालन सुनिश्चित केले, तर पाकिस्तानला हे साध्य झालेले नाही. याच कारणामुळे उत्तरप्रदेश आणि पाकिस्तान यांच्या मृत्यूदरातील अंतर ठळकपणे दिसून येत असल्याचे हुसैन यांनी एक आलेख ट्विट करत म्हटले आहे.
फहद यांनी महाराष्ट्राशी देखील तुलना केली आहे. उत्तरप्रदेशातील मृत्यूदर पाकिस्तानपेक्षा कमी आहे. तर महाराष्ट्रात हे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रात तरुण लोकसंख्या आणि दरडोई उत्पन्नही अधिक आहे. उत्तरप्रदेशने कुठले योग्य निर्णय घेतले आणि महाराष्ट्राने कोणत्या चुका केल्या हे जाणून घेणे गरजेचे आहे. पाकिस्तानची लोकसंख्या 20.8 कोटी असून उत्तरप्रदेशात हेच प्रमाण 22.5 कोटी आहे. तरीही पाकिस्तानच्या तुलनेत तेथे मृत्यूदर खूपच कमी असल्याचे फहद म्हणाले.
बाधितांचे प्रमाण अल्प
उत्तरप्रदेश आणि पाकिस्तानची लोकसंख्या जवळपास समान आहे. परंतु कोरोनाबाधितांच्या आकडय़ात मोठे अंतर आहे. उत्तरप्रदेशातील केवळ 0.0045 टक्के जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात आतापर्यंत 10,536 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर पाकिस्तानात 1,03,671 जणांना संसर्गाची लागण झाली आहे. पाकिस्तानात 2,067 बाधितांचा मृत्यू झाला आहे. उत्तरप्रदेशात आतापर्यंत 275 बळी गेले आहेत.