ताथवडा घाटात पाठलाग आवळल्या मुसक्या
प्रतिनिधी/ सातारा
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (मोक्का) कायद्यानुसार कुख्यात गुन्हेगार योगेश मदने याच्या टोळीवर कारवाई केल्यानंतर फरारी झालेला त्या टोळीचा पंटर किरण आबा मदने (रा. जरांबवस्ती, राजापूर, ता. खटाव) या संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. मदने याच्यावर शिरवळ, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोडा, दरोडय़ाचा प्रयत्न, प्रेमी युगलांना मारहाण करून लुटमार करण्याचा गुन्हा दाखल झाला होता. मदने टोळीला ’मोक्का’ लावल्यानंतर किरण हा फरारी झाला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दरोडा व इतर गुह्यात योगेश मदने टोळीवर दहिवडी, फलटण ग्रामीण, शिरवळ व इतर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या टोळीवर स्थानिक पोलीस ठाण्यांनी प्रस्ताव पाठवल्यानंतर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी मोक्का कायद्यानुसार कारवाई केली होती. त्यानंतर किरण हा फरारी झाला होता.
तो ताथवडा घाट परिसरात लपून बसल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे यांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. साबळे यांनी मिळालेल्या माहितीनुसार ताथवडा घाट येथे सापळा लावला असताना किरण मदने त्यांना सापडला. मात्र, पोलिसांना पाहिल्यानंतर तो दरीत पळून चालला होता. पथकाने तब्बल दोन कि. मी. पाठलाग करुन त्याच्या मुसक्या आवळत अभिनंदनीय कामगिरी बजावली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशी व खात्री करून त्याला पुढील कारवाईसाठी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, हवालदार सुधीर बनकर, पोलीस नाईक शरद बेबले, संतोष सपकाळ, मोहन नाचण, साबीर मुल्ला, राजकुमार ननावरे, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, गणेश कापरे, अमित सपकाळ, केतन शिंदे, प्रवीण फडतरे, रोहित निकम यांनी केली.