वार्ताहर / मौजेदापोली :
दापोली तालुक्यातील कुडावळे येथील नादुरूस्त असलेल्या नळपाणी योजनेची आठ दिवसात दुरूस्ती करण्याचे आदेश सभापती रउफ हजवानी व गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांनी दिले आहेत. यामुळे आठवडाभर आदीवासी वाडीतील ग्रामस्थांना पाणी पाणी करत रहावे लागणार आहे.
कुडावळे ग्रामपंचायतीची नळपाणी योजना 21 नोव्हेंबर पासून बंद आहे. परंतु इतर वाड्यांमधील ग्रामस्थांना इतर पाणी उपलब्ध होत असल्याने कोणती अडचण येत नाही. परंतु आदीवासीवाडीतील ग्रामस्थांना पाण्याची इतर कोणतीही व्यवस्था नसल्याने त्यांना पायपीट करून किंवा विकत पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे आदीवासी वाडीतील ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी दापोलीचे सभापती श्री. हजवानी यांची भेट घेतली होती. त्यानंतर तहसिलदार यांची देखील भेट घेतली.
तहसिलदार यांनी गटविकास अधिकारी यांना फोन द्वारे तातडीने पाणी सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या. गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेविका यांना सांगितले होते. त्याच दुसऱया दिवशी ग्रा. पं. ची मासिक सभा झाली. यात ग्रामसेविकेने गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांबाबत काहीच सांगितले नाही. मात्र पाणी मिळत नसल्यामुळे तिसऱया दिवशी पुन्हा येथील ग्रामस्थ पंचायत समितीत आले. यावेळी त्यांनी न्याय मिळेपर्यंत ठिय्या आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.