स्वीय सहाय्यकासह वाहनचालकाचा समावेश, पंचायत समितीत आठवडाभर प्रवेशबंदी, प्रशासकीय यंत्रणा घास्तावल्या
प्रतिनिधी / खेड
खेड पंचायत समितीत कोरोनाचा शिरकाव झाला असून पंचायत समितीच्या समापतींसह त्यांचे स्वीय सहाय्यक व वाहनचालकाचा कोरोना अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. खबरदारी म्हणून सोमवारपासून पंचायत समितीच्या मुख्य प्रवेशद्वारास कुलूप ठोकण्यात आले असून आठवडाभर प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातून विविध दैनंदिन कामकाजासाठी येथील पंचायत समितीत सतत वर्दळ सुरू असते. सलग दोन दिवस सुट्टीच्या कालावधीमुळे सोमवारी नागरिकांची एकच गर्दी उसळण्याची शक्यता होती. मात्र, पंचायत समिती सभापतींसह अन्य दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सारेच हादरले. प्रशासकीय यंत्रणांची धावाधावच सुरू झाली.
तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना पंचायत समितीत कोरोनाचा शिरकाव झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पंचायत समिती सभापतींच्या कुटुंबातील ५ सदस्यांसह संपर्कातील अन्य व्यक्तींचे स्वॅबचे नमुने घेण्यात आले. यातील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती पुढे आली आहे. पंचायत समितीत कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाने आठवडाभर कार्यालयात प्रवेशबंदी करण्यात आली असून कोणालाही एन्ट्री दिली जाणार नाही.
दोनच दिवसापूर्वी एका जि.प.सदस्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली होती. यापाठोपाठच पंचायत समिती सभापतींनाही कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न होताच नागरिकांसह प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. आतापर्यंत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते. मात्र, पंचायत समितीच्या सभापतींसह अन्य दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सारेच धास्तावले आहेत .