प्रतिनिधी / खेड
खेड तालुक्यातील भरणेनजीक येथील पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास तवेरा कारसह 3 लाख 43 हजार रुपये किंमतीचा गुटखा सापळा रचून जप्त केला. या प्रकरणी तौफिक रजाक मेमन (वय 32 रा. हर्णे-दापोली) यास ताब्यात घेतले आहे.
रजाक हा MH 08 R 8295 या क्रमांकाच्या तवेरा कारमधून गुटख्याची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे व पथकाने सापळा रचला. या कारवाईत हर्णे येथे विक्रीसाठी घेऊन जाणारा 3 लाख 43 हजार रुपये किंमतीचा आरएमडी व विमल गुटखा जप्त केला.
या कारवाई करणार्या पथकात पोलीस नाईक वीरेंद्र आंबेडे, पोलीस शिपाई साजिद नदाफ, अजय कडू, संकेत गुरव यांचा समावेश होता. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. हा गुटखा नेमका आणला कुठून याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच एक लाखाचा गांजा जप्त केला होता. त्यापाठोपाठ 3 लाख 43हजार रुपये किंमतीचा गुटखाही जप्त करण्यात आल्याने गुटखाविक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.