प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीत मेडिकल कॉलेजसाठी दोन जागा निश्चित करण्यात आल्या असून दांडेआडम येथील 17 एकर आणि कापडगाव येथील 8 एकर अशा दोन जागा मिळून 25 एकर जागा अंतिम करण्यात आली आहे. त्यामुळे 2021-2022 या पुढील शैक्षणिक वर्षात 100 विद्यार्थ्यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हय़ातील आरोग्याचा प्रश्न मार्गी लागेल, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
रत्नागिरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात वेगाने कार्यवाही सुरू झाली आहे. प्रशासन या बाबत तातडीने कार्यवाही करत आहे. या संदर्भात गुरूवारी मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली. यावेळी डॉ. विजय शेगावकर, डॉ. शैलेंद्र जाधव व सिव्हील हॉस्पीटल वैद्यकीय अधिकारी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश्री मोरे आदी उपस्थित होते. यासाठी गेल्या दोन दिवसात दांडेआडम, एमआयडीसी आणि सडामिऱया या तीन ठिकाणी जागेची निवड प्राथमिक स्तरावर करण्यात आली होती. यातील दांडेआडममधील 17 एकर जागा निश्चित करण्यासह आणखी आवश्यक असलेली 8 एकर जागा कापडगाव येथे अंतिम करण्यात आली. मेडिकल कॉलेजच्या निकषानुसार सिव्हीलपासून 30 मिनिटाच्या अंतरावर कॉलेज कॅम्पस असावे, अशी तरतूद असल्याने या दोन्ही जागा निकषात बसतात. सुरूवातीला वर्षभर सिव्हील हॉस्पीटल मेडिकल कॉलेज हॉस्पीटल म्हणून वापरण्यात येणार आहे. यासाठीची पूर्वतयारी सिव्हीलमध्ये सुरूही करण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
या महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिया 2021-2022 मध्ये सुरू करण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे रखडलेल्या मेडिकल कॉलेजच्या प्रश्नावर तोडगा निघाला असून लवकरच पुढील कार्यवाही गतीमान होण्यासाठी नियोजन करण्यात आल्याचे सामंत म्हणाले.