रेड बुलच्या व्हर्स्टापेनला दुसरे, मर्सिडीजच्या हॅमिल्टनला तिसरे स्थान
वृत्तसंस्था/ सोची, रशिया
येथे झालेल्या रशियन ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीत मर्सिडीजच्या व्हाल्टेरी बोटासने जेतेपद पटकावले. त्याचा संघसहकारी व चॅम्पियनशिपमध्ये आघाडीवर असलेल्या लेविस हॅमिल्टनला शर्यत सुरू होण्याआधीच नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोनदा 5 सेकंद वेळेचा दंड करण्यात आला. त्यामुळे मायकेल शुमाकरच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची त्याची संधी हुकली. त्याला येथे तिसरे स्थान मिळाले तर रेड बुलच्या मॅक्स व्हर्स्टापेनला दुसरे स्थान मिळाले.
हॅमिल्टनने पोल पोझिशनवरून सुरुवात करून 91 वे जेतेपद पटकावत फेरारीचा माजी ड्रायव्हर मायकेल शुमाकरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी करण्याची आशा बाळगली होती. हॅमिल्टनने ठरलेल्या क्षेत्रात सरावाची सुरुवात न केल्याने स्टीवर्ड्सनी त्याला दोनदा 5 सेकंदाचा दंड केला. त्यामुळे त्याला ग्रिडवर 11 व्या स्थानावरून सुरुवात करावी लागली. याशिवाय त्याला लायसेन्समुळे दोन गुणांचा दंडही करण्यात आला आहे. आणखी दोन गुणांचा दंड झाल्यास त्याच्यावर एका शर्यतीच्या बंदीची कारवाई होऊ शकते. हॅमिल्टनला येथे यश मिळाले नसले तरी बोटासवर त्याने 44 गुणांची आघाडी घेतली आहे. 17 पैकी 10 शर्यती पूर्ण झाल्या आहेत. बोटासला सर्वात जलद लॅप नोंदवल्याबद्दल बोनस गुण मिळाला. बोटासचे हे या मोसमातील दुसरे जेतेपद आहे.
रशियातील ही शर्यत 2014 मध्ये हिवाळी ऑलिम्पिक केंद्रावर आयोजित करण्यात सुरुवात झाली. त्यानंतर प्रत्येक वेळी मर्सिडीजनेच या शर्यतीचे जेतेपद मिळविलेले आहे. रेसिंग पॉईंटच्या सर्जिओ पेरेझने चौथे, रेनॉच्या डॅनियल रिकार्डोने पाचवे, फेरारीच्या चार्लस लेक्लेर्कने सहावे, रेनॉच्या इस्टेबन ओकॉनने सातवे, अल्फा टॉरीचा रशियन ड्रायव्हर डॅनील क्वाटने आठवे, त्याचाच सहकारी पीयरे गॅसलीने नववे आणि रेड बुलच्या अलेक्झांडर अल्बॉनने दहाव्या क्रमांकाचा एक गुण मिळविला. या शर्यतीला प्रेक्षकांना परवानगी देण्यात आली होती. कोरोना महामारीच्या कालावधीत येथे प्रेक्षकांची सर्वात मोठी गर्दी झाली होती.