आयपीएल : सनरायजर्स हैदराबादपुढे पहिला विजय मिळविण्याचे आव्हान
वृत्तसंस्था / अबु धाबी
सलग दोन विजय मिळविल्याने मनोबल दुणावलेला दिल्ली कॅपिटल्स संघ मंगळवारी आयपीएलमधील साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादविरुद्ध हाच जोम कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. याउलट सनराजर्सने दोन्ही सामने गमविले असल्याने विजयपथावर येण्यासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. सायंकाळी 7.30 वाजता सामना सुरू होईल.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सने सुपर ओव्हरमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबवर रोमांचक विजय मिळविल्यानंतर दुसऱया सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सवर मोठा विजय मिळवित गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळविले. याउलट आतापर्यंत एकही विजय न मिळवणारा सनरायजर्स हा एकमेव संघ आहे. त्यांनी दोन्ही सामने गमविले असून डेव्हिड वॉर्नरचा हा संघ यात बदल करण्यास उत्सुक झाले आहे. पहिल्या सामन्यात 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टो (61) व मनीष पांडे (34) यांनी सनरायजर्सला विजयाच्या मार्गावर आणले होते. पण अखेर विजयाचे उद्दिष्ट गाठण्यात ते अपयशीच ठरले.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात सनरायजर्सची मध्यफळी कोलमडली आणि माफक धावसंख्या असल्याने त्यांच्या गोलंदाजांनाही चमक दाखविता आली नाही. वृद्धिमान साहाने त्या सामन्यात संथ फलंदाजी केली होती. त्यामुळे या प्रकाराला आवश्यक असलेल्या गतीने तो धावा जमवेल अशी अपेक्षा करण्यात येत आहे. दिल्लीसाठी रबाडा व ऍन्रिच नॉर्त्जे या वेगवान द्वयीने अचूक वेगवान मारा केला आहे तर आर. अश्व़िनच्या गैरहजेरीत अक्षर पटेल व अमित मिश्रा यांनी फिरकीचे शानदार प्रदर्शन केले आहे. अश्विन दुखापतीतून अद्याप पूर्ण बरा झाला नसल्याने मंगळवारचा सामनाही त्याला हुकणार आहे.
‘अश्विनची दुखापत गंभीर नसून रविवारी त्याने सरावावेळी गोलंदाजीही केली आहे. तो लवकरच संघात परतणार असून फिजिओ त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. सोमवारीदेखील त्याने गोलंदाजी केली. त्यामुळे त्याला आणखी एक सामना हुकणार आहे,’ असे अमित मिश्राने सांगितले. फलंदाजीत शिखर धवनला प्रतिभावान पृथ्वी शॉसमवेत पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून देण्याची जबाबदारी पेलावी लागणार आहे. पंत व अय्यर यांनीही चांगली फलंदाजी केली असून सीएसकेविरुद्ध या दोघांनीच संघाला अडचणीतून बाहेर काढले होते. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू स्टोईनिस व विंडीजचा हेतमेयर हे देखील फलंदाजीत उपयुक्त योगदान देऊ शकतात.
सनरायजर्सला मात्र चांगले प्रदर्शन करण्यासाठी वॉर्नर व बेअरस्टो यांच्यापलीकडे पहावे लागेल. सर्व फलंदाजांनी एकत्रित कामगिरी केली तरच त्यांना मंगळवारी पहिला विजय नोंदवता येऊ शकतो. जखमी मार्शच्या जागी त्यांनी अफगाणचा स्पिनर नबीला संधी दिली आहे. त्याने फलंदाजीत जलद धावा केल्या आणि गोलंदाजीत किफायतशीर माराही केला. मात्र दोन्ही सामन्यात फलंदाजी ढेपाळली असल्याने सनरायजर्सने केन विल्यम्सनला संघात आणण्याचा विचार करण्याची गरज आहे.
संघ : सनरायजर्स हैदराबाद : वॉर्नर (कर्णधार), बेअरस्टो, विल्यम्सन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंग, प्रियम गर्ग, साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, रशिद खान, होल्डर, अभिषेक शर्मा, बी. संदीप, संजय यादव, फॅबियन ऍलेन, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅन्लेक, टी. नटराजन, बसिल थाम्पी.
दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), आर.अश्विन, धवन, पृथ्वी शॉ, हेतमेयर, रबाडा, रहाणे, अमित मिश्रा, पंत, इशांत शर्मा, अक्षर पटेल, संदीप लामिछाने, कीमो पॉल, डॅनियल सॅम्स, मोहित शर्मा, नॉर्त्जे, ऍलेक्स कॅरे, अवेश खान, तुषार देशपांडे, हर्षल पटेल, स्टोईनिस, ललित यादव.
सामन्याची वेळ : सायं. 7.30 पासून थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.